‘भारतमाता की जय’ म्हणण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधानसभेमध्ये उमटले. या विषयावरून सत्ताधारी पक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. पण खुद्द फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांच्या मुद्द्यातील हवाच काढून घेतली. आपले मुख्यमंत्रिपद राहिले काय आणि गेले काय मी भारतमाता की जय म्हणतच राहणार, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मी कोणत्याही जाती, धर्माविरोधात वक्तव्य केलेले नाही. भारतमाता की जय हा काही धार्मिक नारा नाही. ज्या लोकांचे या देशावर प्रेम नाही, त्यांना इथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही, एवढेच मी म्हटलो होतो. यात माझे काहीही चुकलेले नाही. पण विरोधक जाणीवपूर्वक विशिष्ट समाजामध्ये विभाजनाचे बीजारोपण करण्यासाठी आरोप करत आहेत. भारतमाता की जय हा काही वादाचा मुद्दाच नाही.
जावेद अख्तर यांनी राज्यसभेत भारत माता की जय म्हणणे माझा अधिकार असल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील  दर्ग्यात झालेल्या कार्यक्रमात ५०० धर्मगुरूंनी तिथं भारत माता की जय म्हटले होते, याचीही आठवण फडणवीस यांनी आपल्या भाषणावेळी सांगितली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही भारतमाता की जय म्हणण्याचे समर्थन केले, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, संघामध्ये आम्हाला केवळ राष्ट्रवाद शिकवण्यात आला आहे. त्यामुळे तो विषय इथे आणण्याची गरज नाही. मी जे काही बोललो ते या देशाच्या विरोधात असणाऱ्यांबद्दल बोललो. कोणत्याही जाती, धर्माविरोधात बोललेलो नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.