मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शने- घोषणाबाजी करताना पुढाकार घेणारे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक इशारा सोमवारी विधानसभेत दिला.  ‘तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे,  देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही, असा थेट इशाराच दिला. या भाषणानंतर थोडय़ाच वेळात मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक दररोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विविध मागण्या करीत सरकारविरोधात घोषणाबाजी, निदर्शने करतात. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी आज विरोधकाना थेट निर्वाणीचा इशारा दिला.

नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेमधून करण्याबाबत विधानसभेत  मांडलेल्या विधेयकावरून विरोधकांनी विशेषत: राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना  धारेवर धरले. मुख्यमंत्री नाव शिवसेनेचे घेतात आणि कार्यक्रम भाजपचे राबवतात. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ राहावे ऐकनाथ होऊ नये असे टोमणे सदस्यांनी हाणले. त्यावर काहीसे नाराज झालेल्या शिंदे यांनी आपण कोणाच्या दबावाने निर्णय घेत नाही.आम्ही  केवळ जनतेचे एकतो, असे  सडेतोड उत्तर देत विरोधकांना गप्प केले. मी सक्षम असून ‘देवेंद्रजी और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ‘‘ अशी शेरोशायरी करीत शिंदे यांनी आपण सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम केला ना, असा सवाल विरोधकांना केला.

सायबर गुप्तवार्ता विभाग सुरू करणार -फडणवीस

मुंबई : कर्ज देणारी अ‍ॅप, संकेतस्थळे, वर-वधू सूचक संकेतस्थळे आणि अन्य माध्यमांतून सर्वसामान्यांची फसवणूक होत असून चीन आणि नेपाळमधून अशी काही अ‍ॅप चालविली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे राखण्यासाठी सायबर गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स युनिट) राज्यात सुरू करण्यात येईल आणि सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ व यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी काही बाबींसाठी  बाह्यस्रोतांसाठी (आऊटसोर्सिग) मदत घेतली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde warning to dhananjay munde in legislative assembly zws
First published on: 23-08-2022 at 03:14 IST