संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: शिक्षणाची तळमळ असल्याने शहापूरच्या तानसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातून तीन चिमुकली मुले रोज तराफ्याने जीवघेणा प्रवास करत शाळेत जायची. त्यांच्या वडिलांनीच हा तराफा बनवला होता. मुलांनी शिकावे म्हणून तेच तराफ्यावर मुलांना बसवून तानसा तलावातून प्रवास करत सावरदेव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना घेऊन जायचे. शासनाने बोट उपलब्ध द्यावी अशी मागणी शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी केली होती. पण संवेदनाहीन प्रशासनाने चार वर्षांत कधी दाद दिली नव्हती… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या लहान मुलांच्या जीवघेण्या प्रवासाची माहिती मिळाली आणि त्यांनी अवघ्या ४८ तासात या मुलांच्या शिक्षणासाठी बोट व लाईफ जॅकेट उपलब्ध करून दिली. या मुलांनी बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी बोटीने प्रवास केला आणि व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा… मोठी बातमी: जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई या ग्रामपंचायतीअंतर्गत सावरदेव गावात जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. बुडालेपाडा येथून या शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तानसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातून जाण्याशिवाय पर्याय नाही. बुडालेपाडा गावातून जिल्हापरिषदेच्या शाळेत जंगलातून जायचे झाल्यास आठ ते दहा किलोमीटर अंतर पायी तुडविण्याची गरज होती. मारुती चिपडा हा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी व्यक्तीला आपल्या मुलांना शिकविण्याची इच्छा होती तर शाळेत जाऊन शिकायची तळमळ मारुतीची मुलगी सोनाली हिला होती. परिणामी मारुतीने आपल्या घरीच प्लास्टिकच्या चार पाईपना जोडून एक तराफा बनवला. या तराफ्यावर बसून सोनाली, कृतिका व कैलास हा मुलगा अशा तिघांना घेऊन तानसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातून जीवघेणा प्रवास करत मारुती या मुलांना सकाळी नऊ वाजता शाळेत सोडायचा व सायंकाळी पाच वाजता पुन्हा शाळेतून घेऊन यायचा. गेली चार वर्षे मारुती चिमडा या तीन लहान मुलांना घेऊन तराफ्यावर बसवून दीडदोन तासाचा जीवघेणा प्रवास करत शाळेत सोडायचा व घेऊन यायचा. शाळेतील एक शिक्षक शिवलिंग जनवर यांनी वेळोवेळी शासनाच्या संबंधित विभागांच्या तसेच माध्यमांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली होती. तसेच बोटीची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. मात्र गेल्या चार वर्षात संवेदनाहीन शासनाने याची साधी दखलही घेतली नाही.

हेही वाचा… शिंदे गटाला ‘टेस्ट ट्यूब बेबी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमचे बाबा…”

दोनच दिवसांपूर्वी याविषयीचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाले आणि त्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर तात्काळ चक्रे फिरायला सुरुवात झाली. या तीन मुलांसाठी तसेच येथील पाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचा विचार करून तात्काळ बोटी तसेच लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार बुधवारी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या बोटीमधून लाईफ जॅकेट घालून या मुलांनी व त्यांच्या वडिलांनी प्रवास करीत शाळा गाठली. यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या शासकीय अधिकारी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षमधील विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी मोबाईलवर व्हिडिओ कॉलद्वारे या मुलांचा तसेच शाळेतील शिक्षकांचा मुख्यमंत्री शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलण करून दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन बोट उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी मनापासून आभार मानले तसेच मारुती चिमडा यांनाही आता आमचा जीवघेणा प्रवास संपल्याबद्दल आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाचवीत शिकत असलेल्या या मुलांना शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षणाविषयीच्या त्यांच्या तळमळीचे कौतुक केले. या परिसरातील दीड दोनशे लोकसंख्येचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी दोन डिझेल बोटींची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. यातील एका बोटीतून आज ही मुले शाळेत गेली.

हेही वाचा… शिवसेना सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी; हरीश साळवेंच्या युक्तिवादाने ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व मुलांबरोबर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा आगळावेगळा संवाद सुरू होता तेव्हा लोकसत्ताचा प्रतिनिधी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होता. आपल्याला शिकायचे आहे असे या मुलींनी सांगितले तर तराफ्यातून रोज जीवघेणा प्रवास करताना भिती वाटत होती, पण मुलांनी शिकावे असे वाटत असल्याने धोका पत्करून रोज जात होतो, असे मारुतीने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोटीत नियमित डिझेल भरण्याची तसेच बोट व्यवस्थित असेल याची जबाबदारी नायब तहसिलदारांवर सोपवली. तसेच ही बोट चालिवण्याचे काम संबंधित पालक व अन्य एका व्यक्तीला देऊन त्यांच्या उपजीविकेचीही व्यवस्था केली. यावेळी कृतज्ञतेचे अश्रू मारुती चिमडा यांच्या डोळ्यात तरळून गेले. बोटीत बसलेल्या मुलांनाही मुख्यमंत्र्यांशी बोलताना आनंद झाला होता तर शिवलिंग या शिक्षकांना मुख्यमंत्र्यांचे किती आभार मानू असे झाले होते. जिल्हा परिषदेची ही शाळा पाचवीपर्यंत असली तरी शिक्षणाची या मुलांची तळमळ पाहाता आगामी काळात या मुलांच्या शिक्षणाची जबादारी मी घेईन, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister shinde took the initiative to provide boats and life jackets for the students who had to make a dangerous journey for school through the waters of tansa dam in remote areas asj
First published on: 15-02-2023 at 19:26 IST