यवतमाळ : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसनाग्रस्तांना मदत करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यवतमाळ येथे पत्र परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. आचारसंहिता लागू आहे. मात्र, अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता तातडीने पंचनामे करून मदत देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. सरकारचे त्याकडे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांनी घाबरायचे कारण नाही. निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले की, महायुतीला जनाधार मिळत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येतील. खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. त्यांची कालच प्रत्यक्ष भेट घेतली. त्या उद्यापासून प्रचारात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही शिंदे म्हणाले.