सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वांद्रे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनीच ही माहिती दिली आहे. मुंबईतील वांद्रे भागात असणाऱ्या गुरु नानक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या रुग्णालयात त्यांनी कोविड १९ ची चाचणीही करण्यात आली. मात्र या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कदाचित त्यांना येत्या दोन दिवसात डिस्चार्जही मिळू शकतो असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या नृत्य दिग्दर्शिका आहेत. डिंग डाँग डिंग.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं आहे. २०१९ मध्ये आलेल्या कलंक या सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफीही त्यांनी केली आहे.

मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.