नवी मुंबईतील प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने जाहीर केलेले पॅकेज प्रकल्पग्रस्तांना चांगल्या प्रकारे समजावे यासाठी सिडको एक शॉर्ट फिल्म तयार करणार असून सर्व प्रकल्पबाधितांना पॅकेजची माहिती येत्या काही दिवसात घरोघरी पोहचणार आहे. दरम्यान या पॅकेजला सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने आता हे पॅकेज शासनाच्या मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त समितीची या पॅकेजवर मोहर उठल्याने आता या पॅकेजमध्ये अधिक देणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार सिडकोच्या वतीने या बैठकीत करण्यात आला आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या आठवडय़ात सर्वात्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्याला प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने सहमती दर्शवली आहे, पण याचवेळी १८ गावांपैकी सहा गावांतील प्रकल्पग्रस्तांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यासाठी त्यांनी वरचा ओवळा येथे बैठक घेऊन हे पॅकेज मंजूर नसल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून या प्रकल्पाला काही प्रकल्पग्रस्तांचा विरोध असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. या पाश्र्वभूमीवर सिडको प्रकल्पग्रस्तांच्या सर्व शंकाचे निरसन करणारी एक शॉर्ट फिल्म तयार करणार असून ती प्रकल्पग्रस्तांच्या गावात दाखविली जाणार आहे. त्यात ‘एफएसआय म्हणजे काय याबाबत सांगण्यात येणार आहे. वाढीव एफएसआय मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांना जादा क्षेत्रफळ मिळणार आहे. त्यामुळे वाढीव भूखंडाची मागणी या वाढीव एफएसआयने पूर्ण होणार असल्याचे या फिल्मद्वारे सांगण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना केंद्रीय पुनर्वसन पॅकेज स्वीकारण्याची मुभा ठेवण्यात आल्याने त्यांच्या हातात भरपाईच्या रुपात रोख रक्कम मिळणार आहे. सिडकोच्या पॅकेजमध्ये रोख रक्कम नसल्याने प्रकल्पग्रस्त नाराज आहेत. ती नाराजी या नवीन विधेयकामुळे दूर होईल.