अमर सदाशिव शैला, नीलेश अडसूळ
खड्डे बुजवण्याआधीच तक्रारींचे निराकरण झाल्याचे संदेश:- एकीकडे मुंबईकरांनी खड्डय़ांविषयी तक्रार केलेल्या चार हजार ३५१ खड्डय़ांपैकी चार हजार खड्डे बुजवल्याच्या मुंबई महापालिकेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच यामागचे गौडबंगाल आता समोर येत आहे. खड्डय़ांमुळे बेजार झालेल्या नागरिकांनी अॅपद्वारे तक्रारी केल्यानंतर खड्डे बुजवण्याच्या आधीच त्यांना तक्रारींचे निराकरण झाल्याचे संदेश पाठवण्यात येत आहेत. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनीच केलेल्या तक्रारींच्या ‘निपटाऱ्या’वरून ही बाब उघड झाली.
अॅपद्वारे केलेल्या तक्रारींची पालिकेकडून दखल घेतली जाते का, याची पडताळणी करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी पालिकेच्या जी दक्षिण विभागांतर्गत येणाऱ्या सेनापती बापट रस्ता, प्रभादेवी स्थानक, धारावीतील संत रोहिदास मार्गावरील खड्डय़ांची छायाचित्रे काढून त्याची तक्रार पालिकेच्या अॅपवर १३ ते १६ सप्टेंबरच्या दरम्यान नोंदवली. त्यातील तीन ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचे संदेश दोन-तीन दिवसांनी पालिकेने पाठवले. प्रत्यक्षात सेनापती बापट मार्गावरील चौकात असलेल्या एकाच खड्डय़ाची दुरुस्ती करण्यात आली होती, तर पालिकेने खड्डे बुजविण्याचा दावा केलेल्या इतर दोन ठिकाणी खड्डे तसेच आहेत.
तकलादू काम
- पालिकेने सेनापती बापट मार्गावरील ना. म. जोशी मार्ग पोलीस चौकीसमोरील इंडिया बुल स्काय सेंटर येथील चौकातील खड्डे बुजविल्याचे दिसत आहे. मात्र हा सोपस्कारही तात्पुरता आणि तकलादू दिसून येतो. या खड्डय़ांमध्ये कोरडी खडी भरण्यात आली आहे. त्यामुळे जोरदार पावसात ती खडी वाहून जाऊन अपघाताची शक्यता वाढण्याची भीती आहे. तर सेनापती बापट रस्त्यावरीलच अल्केम लॅबोरेटरीजजवळच्या सिमेंटच्या रस्त्यावर मध्यभागी पडलेल्या खड्डय़ाची १३ सप्टेंबरला तक्रार देऊनही त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही.
- कमला मिल गेट क्रमांक दोनच्या समोरच रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या गटाराचे झाकण खचले आहे. त्यामुळे तेथे मोठा चौकोनी खड्डा पडला आहे. हा खड्डा टाळताना वाहनांना कसरत करावी लागते. या खड्डय़ातच पेव्हर ब्लॉकचे तुकडे टाकून कधी तरी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती; परंतु आता तीही उपयोगाची नसल्याने या ठिकाणी दुचाकी अडकून अपघात होण्याची भीती आहे. या खड्डय़ाविषयी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. उलट खड्डे भरल्याचा चुकीचा संदेश पाठविण्यात आला.
- मध्य मुंबईतील शीव-वांद्रेला जोडणाऱ्या धारावीतील संत रोहिदास मार्गावर असणारे खड्डे बुजवण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी पालिके च्या अॅपवर तक्रार करण्यात आली होती. अशोक मिल कंपाऊंड ते काळा किल्ला या दरम्यानच्या संपूर्ण रस्त्याची खड्डय़ांनी चाळण झाली आहे.मात्र या तक्रारीला अद्याप पालिके कडून कोणतीही दाद मिळली नाही. संत रोहिदास मार्गच नव्हे तर धारावीतील माहीम-माटुंग्याला जोडले जाणारे ६० फुटी व ९० फु टी मार्गदेखील असेच खड्डय़ांनी भरून गेले आहेत. नागरिकांच्या तक्रारीवरून ओएनजीसीसमोरील मोठा खड्डा भरण्यात आला. पण तोही कोरडी वाळू टाकून.
- संत रोहिदास चौकातून परळकडे जाणाऱ्या जगन्नाथ भातणकर उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच खड्डय़ांनी एका बाजूचा संपूर्ण रस्ता व्यापला आहे. या खड्डय़ांमुळे येथील वाहतूक कासवगतीने पुढे जात असते. खड्डय़ांमुळे चालकाला वाहनाचा वेग कमी करावा लागतो. परिणामी वाहनांची रांग लागून संत रोहिदास चौकात वाहतूक कोंडी होत होती.