वर्षांपूर्वी बांधलेल्या चौकीचा भाग कोसळला

भल्या पहाटेपासून मुंबई झाडूनलोटून लख्ख करणाऱ्या सफाई कामगारांसाठी पालिकेने नागपाडा परिसरात एक वर्षांपूर्वी बांधलेल्या हजेरी चौकीच्या छपराचा काही भाग मंगळवारी अचानक कोसळला. त्यामुळे सफाई कामगारांच्या हजेरी चौक्यांच्या दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात तब्बल २८ हजार सफाई कामगार असून मुंबईच्या साफसफाईची जबाबदारी या सफाई कामगारांवर आहे. मुंबईतील रस्ते झाडून लख्ख करण्यासाठी सफाई कामगार भल्या पहाटे घरातून बाहेर पडतात आणि नियुक्त केलेल्या ठिकाणाची साफसफाई करण्यासाठी पोहोचतात. तत्पूर्वी हजेरी चौकीवर जाऊन आपली उपस्थिती नोंदवतात. या हजेरी चौक्यांवर पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोली, महिला सफाई कामगारांसाठी स्वतंत्र खोली, विश्रांती घेण्यासाठी जागा आदी विविध सुविधांचा अभाव होता. इतकेच नव्हे तर साफसफाईचे साहित्य सुरक्षितपणे ठेवण्यापुरतीही जागा तेथे उपलब्ध नव्हती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते केवल सेमलानी यांनी २००६ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. सफाई कामगारांसाठी मुंबईत सर्व सुविधांनी युक्त अशा चौक्या बांधण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला २००७ मध्ये दिले होते.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पालिकेने सफाई कामगारांच्या हजेरी चौक्यांची दुरुस्ती हाती घेण्याचा निर्णय घेतला. नव्या चौक्या बांधणे आणि जुन्या चौक्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल १२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मुंबईमध्ये सफाई कामगारांच्या २४० चौक्या असून त्यापैकी काही चौक्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. २४० पैकी ७२ चौक्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

नागपाडा परिसरातील खाण्डिया स्ट्रीटवरील हजेरी चौकीची १५ लाख ४ हजार ८७९ रुपये खर्च करून गेल्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र मंगळवारी कोसळलेल्या पावसाच्या तडाख्यात या चौकीच्या पुढील भागात लोखंडी खांबांच्या साह्य़ाने उभारलेल्या छपराचा काही भाग अचानक कोसळला. दुरुस्ती झाल्यानंतर ही चौकी अद्याप हस्तांतरित करण्यात आली नव्हती. त्यामुळे या चौकीत सफाई कामगार नव्हते. परिणामी मोठी दुर्घटना टळली.

पालिकेने दुरुस्ती केलेल्या चौक्यांची अवस्था आजघडीला दयनीय बनली आहे. दुरुस्ती केल्यानंतर या चौक्यांची देखभालच करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात काही चौक्यांमध्ये जलाभिषेक होऊ लागला आहे.