सत्तास्थापनेपासूनच सरकावर नाराज असणाऱ्या मित्रपक्षांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घटकपक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. महायुतीतील घटकपक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असून यावेळी मुख्यमंत्री मित्रपक्षाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतील. सत्तेत अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे महायुतीतील घटकपक्ष भाजपवर सुरूवातीपासूनच नाराज आहेत. काल पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने ही नाराजी टोकाला पोहचल्याचे दिसून आले. यावेळी व्यासपीठावर महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून आले. यावेळी महादेव जानकरांनी राष्ट्रवादीला उद्देशून संबंध असेच राहिले तर पुढील विधानसभा एकत्र लढवू, असे जाहीर केले. एवढेच नव्हे तर भाजप आणि काँग्रेस एकच असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेनेची सत्ता आली तरी चालेल, असे म्हणत महादेव जानकर यांनी भाजपबद्दलची कटूता बोलून दाखवली. सदाभाऊ खोत यांनीही आपल्या भाषणात नाराजी बोलवून दाखवली होती. याशिवाय, गेल्या काही दिवसांत शिवसेना वारंवार राज्य आणि केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहे. या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक आयोजित केल्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis calls alliance meeting
First published on: 08-03-2016 at 12:10 IST