Divija Fadnavis on Eco Friendly Bappa: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जुहू येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर दिविजा फडणवीसने माध्यमांशी संवाद साधताना तरूणांनी स्वच्छतेच्या मोहिमेत उतरायला हवे, असे आवाहन केले. तसेच गणेश भक्तांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती वापरण्याचा भावनिक संदेशही दिला.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना दिविजा फडणवीस म्हणाली, “मला आज इथे स्वच्छता करण्याची संधी मिळाली, यासाठी मला खूप आनंद होत आहे. स्वच्छता करत असताना मला समुद्रकिनाऱ्यावर बाप्पाच्या मूर्तीचे अवशेष आढळून आले. ज्यामुळे मला वाईट वाटले. त्यामुळेच मी गणेशभक्तांना सांगू इच्छिते की, त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने हा उत्सव साजरा करावा. जेणेकरून आपल्या बाप्पाचा अवमान होणार नाही.”

गणेश मूर्ती पीओपीच्या असाव्यात की पर्यावरणपूरक यावरून कायदेशीर वाद सुरू आहे. मात्र यावर दिविज फडणवीसने स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर तिला वाटलेले मत प्रांजळपणे व्यक्त केले. यातून तिचा स्वच्छतेबाबतचा आग्रह दिसून आला.

मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब वाहिनीशी संवाद साधत असताना दिविज फडणवीस यांनी सनातनचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “आपल्या मुंबईतील समुद्रकिनारे हे आपल्यासाठी देवासमान आहेत. ते आपल्या शहराची शान आहेत. ते जर स्वच्छ ठेवले नाहीत, तर आपण काय कामाचे. त्यांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. सनातन धर्मातही स्वच्छतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जर आपण सनातन धर्माला मानत असू आणि स्वच्छता राखत नसू तर मग आपण सनातनी कसले?”

तरूणांना आवाहन करताना दिविज फडणवीसने सांगितले की, आजच्या तरूणाईला वाटते की, स्वच्छता हे आपले काम नाही. पण आपण देशाचे भविष्य आहोत आणि देशाला आपली गरज आहे. त्यामुळे आपणही घराबाहेर पडून देशाची सेवा केली पाहिजे. स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. आपण स्वतः त्यात योगदान द्यायला हवे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे.

अभिनेता अक्षय कुमारनेही स्वच्छता मोहिमेनंतर सांगितले की, आपण स्वच्छता राखली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. स्वच्छता ही केवळ सरकार किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नाही, तर आपण सर्वांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे.

तसेच अमृता फडणवीस यांनीही आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सर्वांना स्वच्छता राखण्याचा संदेश दिला. तसेच त्यांनी स्वतः स्वच्छता अभियान सुरू केले. त्याचाच परिणाम असा की स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून आज मोठ्या संख्येने लोक स्वच्छतेसाठी एकत्र येत आहेत.