मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील दोन पुनर्वसित इमारतीमधील ५५६ घरांचे चावी वाटप करण्यात येणार असून तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गालगतच्या मरीन ड्राईव्हपेक्षा मोठ्या समुद्री पदपथाचेही (प्रोमेनेड) लोकार्पण करून तो सर्वसामन्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
त्याचवेळी अमर महल जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास थेट, सिग्नलमुक्त ३० ते ३५ मिनिटांत पार करता यावे यासाठी बांधण्यात आलेल्या पानबाई शाळा ते वाकोला नाला उन्नत रस्ता आणि कलानगर जंक्शन येथील धारावी ते वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) इतर तीन प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या इमारतीतील ५५६ घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी मांटुगा येथील यशवंत नाट्य मंदिरात सकाळी ११ वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १५ रहिवाशांना चावी वाटप केले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित रहिवाशांना प्रकल्पस्थळी चावी वाटप केले जाणार आहे.
महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पातील पहिल्या ५५६ रहिवाशांना हक्काच्या घराचे वाटप केले जाणार असल्याने गुरुवारचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बीडीडी चाळीतील घरांच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एमएमआरडीएच्या पाच प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता बांधला आहे. याच प्रकल्पाच्या विस्तारीकरणाअंतर्गत कपाडिया नगर – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान ३.०६ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यात आला आहे.
यातील वाकोला नाला – पानबाई शाळा दरम्यानच्या १.०२ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे काम शिल्लक होते. हे काम पूर्ण झाल्याने आता गुरुवारी मुख्यमंत्री या उन्नत रस्त्याचे लोकार्पण करतील. त्यानंतर काही वेळाने हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास सिग्नलमुक्त, केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येणार आहे. तर वाकोला जंक्शनवरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्त्यासह कलानगर जंक्शन येथील धारावी ते वांद्रे-वरळी सागरी सेतू उड्डाणपुलाचेही लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री करणार आहेत. हा पूल खुला झाल्यास बीकेसीतील आणि कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. एमएमआरडीएकडून मालवणी येथे निवासस्थान बांधण्यात आले असून मंडाले येथे सर्वात मोठे मुंबई मेट्रो प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे.
या दोन्ही प्रकल्पाचेही यावेळी लोकार्पण होणार आहे. यासह आणखी एका प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पालिकेकडून सागरी किनारा मार्गालगत ७.५ किमीचा समुद्री पदपथ तयार करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह समुद्र पदपथापेक्षाही मोठा असा हा समुद्री पदपथ आहे. या पदपथातील प्रियदर्शनी पार्क ते हाजीअली आणि बडोदा पॅलेस ते वरळी या भागातील समुद्री पदपथाचे ई लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.