मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात समन्वयासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संबंधितांना दिले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद आणि माहितीचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातील सुरक्षा व्यवस्था आणि सज्जता याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच लष्कर आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सुरक्षा महत्त्वाची आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला, हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

संरक्षण दलाचे कौतुक

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यानी हल्ला करून पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने नुकताच ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. लष्कराने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले, ते अभूतपूर्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दलांचे कौतुक केले.