मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पाच प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वितरीत करण्यात आल्या असून एमएमआरडीएला मात्र राज्य शिष्टाचाराचा विसर पडला आहे. या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांचे नावच छापण्यात आलेले नाही. राज्य शिष्टाचाराप्रमाणे ज्या ठिकाणच्या प्रकल्पाचे लोकार्पण, उद्घाटन आहे, त्या ठिकाणच्या स्थानिक आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापले जाते. मात्र एमएमआरडीएने वरुण सरदेसाईंचे नाव न छापल्याने त्यांनी समाजमाध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून आपले नाव छापले नाही का, असा प्रश्न विचारत हे राज्य शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरणातील वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्ता आणि धारावीकडून वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दिशेने जाणाऱ्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवारी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन बरेच दिवस झाले तरी केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने त्यांचे लोकार्पण रखडले होते. प्रकल्प वाहतुकीसाठी खुले होत नसल्याने प्रवाशांना, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी हे दोन्ही प्रकल्प तातडीने वाहतुकीसाठी खुले करावेत, यासाठी एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूल रस्ता रोधक हटवून काही वेळासाठी खुलाही केला होता. तर अधिवेशनातही उन्नत रस्ता आणि पूल तातडीने खुले करण्याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर आता गुरुवारी या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. राज्य शिष्टाचाराप्रमाणे स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव असणे आवश्यक होते. मात्र त्यांचे नावच पत्रिकेत नसल्याचे समोर आले आहे. ही बाब राज्य शिष्टाचाराच्याविरोधात असल्याचे म्हणत वरुण सरदेसाई यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. निमंत्रण पत्रिकेवर नाव नाहीच, पण कार्यक्रमासाठी काही तास शिल्लक असताना, माझे नाव निमंत्रण पत्रिकेवर नसल्याचे मी समाज माध्यमातून निदर्शनास आणून दिल्यानंतर एमएमआरडीएने संपर्क साधून मला निमंत्रण दिल्याचे सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
माझे नाव निमंत्रण पत्रिकेवर नाहीच, पण कलिनाचे स्थानिक आमदार, ज्यांच्या मतदारसंघातून उन्नत रस्ता जातो त्या ठिकाणचे आमदार संजय पोतनीस यांचेही नाव पत्रिकेवर नाही असेही त्यांनी सांगितले. तर एमएमआरडीएकडून निमंत्रण आले असले तरी या कार्यक्रमास जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. वांद्रयातील एमएमआरडीए कार्यालयात असतानाही स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचेही त्यांनी सांगितले. याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.