मुंबई : मुंबईतील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात याव्यात, परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवी यासाठी गेल्या १० वर्षांमध्ये विकासक आणि त्यांच्या संघटनांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली. त्यांना सवलती देण्यात आल्या. पण १० वर्षांमध्ये घरांच्या किंमती कमी झाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकांची कानउघाडणी केली. क्रेडाय-एमसीएचआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका वर्षात इमारती उभ्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे, ते तंत्रज्ञान आणा, आम्ही आवश्यक ती मदत करू, असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) क्रेडाय-एमसीएचआयकडून नवीन समिती नियुक्त करण्यात आली आहे. नवनियुक्त अध्यक्ष सुखराज नाहर यांनी मावळते अध्यक्ष डाॅमिनिक रोमल यांच्या हस्ते पदभार स्वीकारण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे देणे ही दोनच आमची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. मात्र ही उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी विकासकांकडून आवश्यक ती मदत होत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. विकासक झोपडपट्टी योजना घेतात आणि पुनर्वसित इमारती सात-सात, आठ-आठ वर्ष पूर्ण करत नाहीत. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. जर आपल्याला खऱ्या अर्थाने मुंबई झोपडपट्टीमुक्त करायची असेल तर आम्हाला तुमची साथ हवी आहे. एका वर्षात इमारती उभारण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान जभरात विकसित झाले आहे, ते तंत्रज्ञान मुंबईत आणा आणि झोपु योजना राबवा. मी तुम्हाला आवश्यक ती मदत करतो. एका वर्षात पुनर्वसित इमारती बांधा आणि विक्री घटकात परवडणारी घरे बांधा. असे झाले तरच लवकरात लवकर झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
कोणत्याही विकासक संघटनेच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर विकासकांकडून कोणत्या ना कोणत्या मागण्या केल्या जातात, सवलती मागितल्या जातात. त्यानुसार मागील १० वर्षांत विकासकांच्या मागण्या मान्य करून सवलती देण्यात आल्या आहेत. केवळ परवडणारी घरे सर्वसामान्यांना उपलब्ध होतील म्हणून आम्ही सवलती दिल्या. पण इतक्या सवलती देऊन, प्रीमियम कमी करूनही मुंबईतील घरांच्या किंमती कमी झाल्या नाहीत, असा मुद्द उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी विकासकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पायाभूत सुविधांचा विकास नागरिकांसाठी असतोच, पण त्याचवेळी पायाभूत सुविधांलगत परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईल अशी अपेक्षा आम्हाला असते. पण अटल सेतू असो वा इतर कोणताही प्रकल्प, या प्रकल्पालगतच्या घरांच्या किंमती कमी होण्याऐवजी गगनाला भिडल्या आहेत, असे ते म्हणाले. सरकारकडून तिसरी मुंबई अटल सेतूच्या पायथ्याशी आणि पालघर वाढवण बंदरालगत चौथी मुंबई वसविली जाणार आहे. या चौथ्या, तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून एमएमआर जागतिक आर्थिक विकास केंद्र होणार आहे. विकासकांना ही एक चांगली संधी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.