शिवसेनेशी चर्चेची तयारी असली तरी मुख्यमंत्री पदावरून आग्रही भूमिका घेतल्याने तूर्तास ‘मातोश्री’वर न जाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची अट शिवसेनेने मागे घेतल्यास मुख्यमंत्री स्वत: वाटाघाटी सुरू करण्याची शक्यता आहे. भाजपही आक्रमक असून शिवसेनेपुढे झुकल्याचे चित्र निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्लीला जाऊन अध्यक्ष अमित शहा यांच्याशी सोमवारी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनास उशीर झाल्याने त्यांची व मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होऊ शकली नाही; पण सरकार स्थापनेबाबत कशा प्रकारे पावले टाकायची आणि शिवसेनेबरोबर कशी व्यूहरचना करायची, याविषयी मुख्यमंत्री फडणवीस व शहा यांच्यात चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सत्तावाटपाचे सूत्र ठरविले होते; पण अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय झाला नव्हता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने ठाकरे सध्या नाराज आहेत. त्याचबरोबर शहा किंवा फडणवीस यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा करावी, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे; पण मध्यस्थांमार्फत वेगवेगळे प्रस्ताव पाठवून शिवसेनेची दमछाक करण्याचे भाजपचे धोरण आहे.