प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण, डिसेंबरमध्ये मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगावदरम्यान १९.८० किमीच्या नवीन मार्गिकेचे अर्थात मिसिंग लिंकचे काम करीत आहे. या कामाची शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी कामाचा आढावा घेऊन या प्रकल्पाचे काम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असून ते योग्यप्रकारे एमएसआरडीसीकडून केले जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरपर्यंत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती एमएसआरडीसीकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार असून असे झाल्यास डिसेंबरपासून मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे वाहनचालक-प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून हा महामार्ग आता अपुरा पडत आहे. तर अपघातांचीही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्गाची सुधारणा म्हणून एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव १९.८० किमीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. २०१९ पासून या प्रकल्पाचे दोन टप्प्यात काम सुरू आहे. या प्रकल्पात दोन बोगद्यांचाही समावेश आहे. त्यातील एक बोगदा १.७५ किमीचा, तर दुसरा ८.९२ किमीचा आहे. त्यातील ८.९२ किमीचा बोगदा आशियातील सर्वांत रुंद डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे.
लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात येत आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारकाईने विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात येणार असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात येणार आहे.
आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असेल. हा बोगदा, नवी मार्गिका अनेक कारणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे. एमएसआरडीसीच्या या प्रकल्पाच्या कामाची शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमं त्र्यांनी पाहणी केली. हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रकल्पाचे कौतुक केले. तर प्रकल्पाचे काम करणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे.
दऱ्याखोऱ्यांतून ही मार्गिका जात असून प्रचंड वेगाने वारे वाहत असताना काम करणे अत्यंत अवघड असते. पण अशा परिस्थितीतही प्रकल्पाचे काम योग्यप्रकारे सुरू असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. मात्र त्याआधी ऑक्टोबर वा नोव्हेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करावा असा आमचा आग्रह आहे. त्यानुसार एमएसआरडीसीशी चर्चा करून नवीन तारीख ठरवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.