आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जागावाटपाचे सूत्र काय, यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांत सुरू असलेला कलगीतुरा आता दिल्ली दरबारी गेला आहे. राष्ट्रवादीने २२ जागांचा आग्रह धरला असला तरी एवढय़ा जागा सद्यस्थितीत सोडणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासमोर सोमवारी नवी दिल्लीत केला. राहुल कोणती भूमिका घेतात यावरच जागावाटपाचे सूत्र ठरणार आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अहमद पटेल, जनार्दन द्विवेदी आणि मोहनप्रकाश हे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीसोबतची आघाडी बैठकीचा मुख्य विषय होता. काँग्रेसने २६ तर आपण २२ जागा लढवाव्यात, असे सूत्र राष्ट्रवादीने मांडले आहे. मात्र या सूत्रानुसार जागावाटप करू नये, असा राज्यातील नेत्यांचा आग्रह होता. तसेच राष्ट्रवादी राज्यात चर्चा करण्यास टाळाटाळ करीत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांना कितपत प्रतिसाद मिळतो यासह मनसे कोणती भूमिका घेऊ शकते, यावर चर्चा झाल्याचे समजते.
राहुल गांधी यांच्याबरोबरील बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती, अन्न सुरक्षा कायदा याबाबत चर्चा झाल्याचे समजते.