भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करतानाच  राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा मौलिक सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्याा नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या राज्यातील ७९ उमेदवारांचा गौरव समारंभ विधान मंडळामार्फत विधान भवनात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी या वेळी उपस्थित होते.

प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडून राज्य, देश सर्वोत्तम झाले पाहिजे ही जिद्द बाळगा. शासन आणि प्रशासन ही दोन चाके असल्याने चुकीचे काम होऊ न देता चांगल्या कामावर ठाम राहून आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. राज्यातील सध्याचे प्रशासकीय अधिकारी उत्तम काम करीत असून सर्वाच्या सहकार्याने शासन सकारात्मकतेने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाना पटोले यांनी शासनाने राज्यातील प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र सर्व विभागीय पातळीवर सुरू करून त्यांचे सशक्तीकरण करावे, अशी सूचनाही केली. फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकारी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा ठरवणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. आपल्या अधिकारांचा सकारात्मक उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करायची आहे, हे विसरू नका, असा सल्लाही दिला.  यशस्वी उमेदवारांच्या वतीने नेहा भोसले आणि मंदार पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना या सत्कारातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव असून ती निश्चित पार पाडू, असा विश्वासही व्यक्त केला.

सर्वसामान्यांना न्याय द्या -अजित पवार

विधीमंडळाच्या इमारतीत हा सत्कार होत असल्याने याला विशेष महत्त्व असल्याचे सांगून आपण कोणतीही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कराल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  व्यक्त केला. यशस्वी उमेदवारांचे कौतुक करून कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनून तो सोडवण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त के ली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray advice to the officers joining the administrative service zws
First published on: 15-09-2020 at 01:39 IST