धर्मवीर चित्रपट पाहून आल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चित्रपटाचं कौतुक करताना सर्वांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असं आवाहनही केलं आहे. यावेळी त्यांनी अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, आयुष्यात आनंद देणारे आमचे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी अभिनयाच्या माध्यमातून पुन्हा जीवंत केले आहेत.

“आम्ही चित्रपट पाहातोय असं कुठंच जाणवलं नाही. प्रसाद ओकने अप्रतिम अभिनय साकारला असून आनंद दिघेंच्या बारीक-सारीक लकबी हुबेहूब साकारल्या आहेत. त्यानं हे सर्व कसं केलं माहीत नाही. पण हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“आयुष्य कसं जगावं? हे शिकवणारा एक माणूस आपल्यामध्ये होता, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. ‘प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असला पाहिजे’ हे चित्रपटातील वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आनंद दिघे नावाचा धाक शहरात असेल तर शहारातील महिला-भगिनींचं आपोआप रक्षण होईल,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

त्यांनी पुढे सांगितलं की, “चित्रपटाचा खरा भाग आम्ही पाहिला आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचं नातं आधिक घट्ट होतं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे धर्मनिष्ठा आणि जनतेवर निस्सीम प्रेम करणारे होते. गुरू शिष्याचं नातं कसं असावं, याचं उत्तम उदाहरण हे दोघं आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बाळासाहेबांची एक आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “दोघांच्या अनेक आठवणी आहेत. आनंद दिघे कधीही वेळेवर पोहोचत नसायचे. त्यामुळे बाळासाहेब त्यांच्यावर थोडेसं रागवायचे. त्यानंतर आनंद दिघे काही वेळ शांतपणे उभे राहायचे. त्यानंतर कशाला आलास? असं विचारला असता, आनंद दिघे म्हणाले की, ठाण्यात निवडणुका आहेत. हे घ्या उमेदवारांची यादी. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, ठाण्यात भगवा फडकवशील का? मग जा जे करायचं ते कर, एवढा विश्वास दोघांच्या नात्यात होता. त्यांचं नातं गुरू- शिष्यापेक्षा अधिक घट्ट होतं,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.