विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी घटनेत केलेल्या बदलांना धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळालेली नसतानाही अट्टाहासाने हे संमेलन आयोजित करण्याच्या खटाटोप करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. आत्तापर्यंत ज्या तीन ठिकाणी ही विश्व मराठी साहित्य संमेलने झाली त्या त्या ठिकाणी महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचे ‘सगेसोयरे’ नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले होते. आता हा निव्वळ ‘योगायोग’ होता की ‘ठरवून’ केलेले नियोजन, असा प्रश्न साहित्य वर्तुळात चर्चिला जात आहे.    
यंदाच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने महामंडळाला दिले होते. महामंडळाने ते निमंत्रण स्वीकारलेही. तेवढय़ात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने हे संमेलन घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता हे संमेलन होणार नाही. गेल्या वर्षी टोरांटो येथे होणारे संमेलन आयोजक आणि महामंडळाच्या वादात रद्द झाले होते. हाही निव्वळ ‘योगायोग’ म्हणायचा.
सॅन होजे येथे झालेले पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन ‘कौतिका’चे ठरले होते. मुळात दरवर्षी महाराष्ट्रात किंवा भारतात होणारेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परदेशात भरविण्याचा घाट त्यावेळी घालण्यात आला होता. मात्र साहित्य वर्तुळातून याला तीव्र विरोध झाल्यानंतर महामंडळाने त्या वेळी यातून ‘विश्व मराठी संमेलन’ अशी पळवाट काढली. साहित्य महामंडळाच्या घटनेत कोणतीही तरतूद नसतानाही हे संमेलन हट्टाने घेण्यात आले. सॅनहोजेनंतर दुबई आणि सिंगापूर येथे ही संमेलने झाली. ही तीनही ठिकाणी महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचे ‘सगेसोयरे’ नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले होते. हा निव्वळ ‘योगायोग’ ही संशोधनाची बाब आहे.