दोन इमारती पाडण्यास आजपासून सुरुवात 

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगावमधील प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला नव्या वर्षांत सुरुवात करण्यात आली आहे. नायगावमधील दोन इमारती पाडण्याच्या कामाला मंगळवारी, ४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यासाठी लागणारी यंत्रसामग्री प्रकल्पस्थळी सज्ज करण्यात आली असून पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुनर्विकास टप्प्याटप्प्याने पूर्ण होताना ऐतिहासिक बीडीडी इमारती काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.

 १०० वर्षांहुन अधिक जुन्या अशा वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ मध्ये झाले. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. वरळीतील कामाला जुलै २०२१ मध्ये सुरुवात झाली. तर आता नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्यात येत आहे. मुंबई मंडळाने अखेर नायगावमधील इमारत क्रमांक ५ ए आणि ८ मधील १०० टक्के रहिवाशांचे स्थलांतर केले आहे. त्यामुळे आता या दोन्ही इमारती पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही इमारतींचे पाडकाम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.  इमारतींचे पाडकाम एल अ‍ॅण्ड टी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठीची सर्व यंत्रसामग्री प्रकल्पस्थळी आणण्यात आली आहे. इमारतींचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर जागा मोकळी करून पुढे प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. नायगावमधील अंदाजे १६० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ना. म. जोशी मार्ग येथील २७२ हून अधिक रहिवाशांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. पण येथील प्रत्यक्ष कामाला मात्र अजूनही सुरुवात झालेली नाही. पुनर्विकासाला प्रत्यक्ष कधी सुरुवात होणार याची रहिवाशांना प्रतीक्षा आहे. त्याबाबत मुंबई मंडळाकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.