मुंबई : एका नामांकित कंपनीत कायदेशीर सल्लागार असलेल्या अधिकाऱ्याची नामांकित वित्त संस्थेच्या नावाने गुंतवणूकीचे आमिष दाखवून तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पूर्व सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला.तक्रारदार एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सध्या ते कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. मुलुंड (पश्चिम) येथील त्यांच्या निवासस्थानी असताना जून २०२५ मध्ये त्यांना सुमन गुप्ता नावाच्या महिलेचा व्हॉट्सअपवर संदेश आला. तिने मुंबईतील एका नामांकित वित्त संस्थेतून बोलत असल्याचे सांगितले.

कंपनीच्या अधिकृत ट्रेडिंग ॲपद्वारे गुंतवणुकीची आकर्षक संधी असल्याचे तिने तक्रारदाराला सांगितले. तिने पाठवलेल्या लिंकवरून तक्रारदाराने ॲप इन्स्टॉल केले आणि पॅनकार्ड व वैयक्तिक माहिती देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना कंपनीच्या नावाने असलेल्या एका व्हॉट्सअप समूहात सामील करण्यात आले, जिथे कथित कंपनी अधिकारी दररोज गुंतवणुकीचे सल्ले, आयपीओ अपडेट्स आणि म्युच्युअल फंडविषयी माहिती देत होते.

छोटा नफा देऊन जाळ्यात ओढले

सुरुवातीला तक्रारदार अधिकाऱ्याने छोट्या प्रमाणात गुंतवणूक केली. ॲपवरील त्यांच्या खात्यात नफा दिसल्याने त्यांचा विश्वास बसला. हळूहळू त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सुमन गुप्ता व इतरांच्या सूचनेनुसार त्यांनी बँक खात्यातून विविध खात्यांमध्ये पैसे वर्ग केले.

५ महिन्यात १० कोटी गमावले

जून ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान तकारदाराने ९ कोटी ९४ लाख रुपये विविध खात्यांमध्ये आयपीओ व म्युच्युअल फंड खरेदीसाठी पाठवली. मात्र, जेव्हा त्यांनी ॲपमधून नफा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्यवहार अयशस्वी झाले. त्याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले. पैसे काढण्यासाठी कर आणि दलालीपोटी आणखी पैशांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराला संशय आला. त्यांनी स्वतः मालाड येथील संबंधित वित्त संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. तिथे सुमन गुप्ता नावाची कुणी महिला तेथे काम करीत नसल्याचे समजले. ते ॲपही त्या वित्त संस्थेचे नव्हते. त्या वित्त संस्थेचे नाव वापरून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तक्रारदार अधिकाऱ्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पूर्व विभाग सायबर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला.