टायअप किंवा इंटिग्रेटेड कोर्सेसच्या नावाखाली कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच दुकाने थाटून बस्तान बसवू पाहणाऱ्या क्लासचालकांचे नवनवीन ‘फंडे’ जुन्या व प्रस्थापित क्लासचालकांचा पचनी पडत नसल्याने क्लासचालकांमध्येच मतभेद निर्माण होऊन संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
केंद्रीय प्रवेश परीक्षांमुळे कोटा, हैदराबाद येथील अनेक प्रस्थापित क्लासचालक आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात आपले बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहेत. जेईई, नीट या परीक्षांसाठी आवश्यक असलेले अध्ययनाचे तंत्र या क्लासचालकांनी चांगले अवगत केले आहे. पण, नव्या ठिकाणी क्लास सुरू करायचा तर त्यासाठी जागा भाडय़ाने घेणे, बैठकीची, पिण्याच्या पाण्याची, वीजेची, इतर सोयीसुविधा अशी सर्वच व्यवस्था करावी लागते. त्यातून क्लासची जागा विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता म्हणून रेल्वे स्थानकाजवळ असावी लागते. या जागेसाठी लागणारे भाडे अतिप्रचंड आहे. हा खटाटोप करून वर विद्यार्थी आले तर ठीक नाहीतर सगळेच आर्थिक गणित कोसळते. म्हणून महाविद्यालयांशीच ‘टायअप’चा फंडा नव्या क्लासचालकांनी शोधला. हेच मुंबईतील जुन्या प्रस्थापित क्लासचालकांच्यामुळावर येऊ लागले आहे. टायअपमुळे क्लास बाजारपेठेची गणिते बदलू लागली आहेत. यात महाविद्यालयांनाही त्यांचा वाटा द्यावा लागत असल्याने शुल्क वाढवावे लागते. शिवाय अनेक शैक्षणिक गैरपद्धतींचा वापर करावा लागतो. त्यामुळे, वर्षांनुवर्षे भाडय़ाने किंवा मालकीची जागा असलेल्या जुन्या क्लासचालकांना टायअप किंवा इंटिग्रेटेड कोर्सेसमध्ये फारसा रस नाही.

टायअपचा प्रकार गेल्या वर्षीपासूनच सुरू झाला. पण, या वर्षी उठसूठ सर्वच महाविद्यालये आणि क्सासेस हे टायअप करू लागले आहेत. हा प्रकार महाविद्यालये आणि क्लासचालकांच्याही मुळावर येणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकाराला विरोध राहील. व्हॅल्यू एज्युकेशन वगैरे गोष्टी सगळे ठीक आहे. पण, या प्रकारामुळे पैशाच्या ‘व्हॅल्यू’लाच अधिक महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही या गैरप्रकाराची तक्रार शिक्षणमंत्र्यांकडे करणार आहोत. – प्रा. नरेंद्र भांबवानी, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन

नीट, जेईईच्या नावाखाली क्लासेसशी टायअप करण्याच्या प्रकारालाही आमचा विरोध आहे. टायअपच्या नावाखाली महाविद्यालयांच्या जागेचा वापर करणे चुकीचे आहे. प्रसंगी या प्रश्नावर आम्ही आंदोलन करू.  – अनिल देशमुख, सरचिटणीस, ‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ’

केंद्रीय प्रवेश परीक्षांमुळे अकरावी-बारावीच्या स्तरावर सुरू झालेल्या शैक्षणिक दुकानांचा सविस्तर आढावा गेले दहा दिवस आम्ही या वृत्तमालिकेच्या आधारे घेतला. त्यानंतर शिक्षणाच्या विविध क्षेत्रात सुरू असलेल्या ‘दुकानदारी’चे बिंग फोडणाऱ्या माहितीचा ओघ सुरू झाला. त्यामुळे, शिक्षणाच्या विविध क्षेत्रातली ही बाजारू वृत्ती चव्हाटावर आणण्याचे काम ‘लोकसत्ता’ या पुढेही करत राहील. तूर्तास या वृत्तमालिकेला अल्पविराम.