रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी प्रवासी बस चालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसविण्यासाठी आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी परिवहन विभागाने तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीत ‘मोबाईल अ‍ॅप’ची सुविधा असून परिवहन आयुक्त कार्यालय सध्या त्यावर काम सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल अॅपला काहीसा विलंब झाला असून लवकरच हे अॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मनमानी कारभार करणाऱ्या वाहनचालकाच्या वाहनाचे आणि वाहन क्रमांकाचे छायाचित्र पाठविल्यास त्याची त्वरित संबंधित आरटीओकडून दखल घेण्यात येईल आणि संबंधितांवर करण्यात येईल.

जादा भाडे घेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांबरोबर विनाकारण हुज्जत घालणे असे प्रकार वाहनचालकांकडून होत असतात. त्यामुळे तक्रारी करण्यासाठी प्रवासी प्रथम वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधतात. मात्र आरटीओकडे तशी सुविधा नाही. प्रवाशांना परिवहन विभागाच्या ई-मेलवर तक्रार करावी लागते. अनेक तक्रारी मेलवर येतात. मात्र त्यांचा योग्य पद्धतीने निराकरण होत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने मोबाइल अ‍ॅपची सुविधा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल अ‍ॅपची सुविधा २०१७ मध्ये सेवेत होती. तांत्रिक कारणास्तव ही सेवा २०२० मध्ये बंद पडली. या ॲपचे काम महाआयटीकडे सोपविण्यात आले आहे. ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भभवल्या असून त्या सोडवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महाआयटी तांत्रिक समस्या सोडवण्यात यशस्वी ठरल्यास महिनाभरातही हे अॅप सेवेत दाखल होईल. समस्या न सुटल्यास, नव्याने निविदा मागलून एखाद्या आयटी कंपनीची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात येईल. तसे झाल्यास साधारण तीन महिन्यात मोबाइल ॲप सेवेत दाखल होऊ शकेल. मात्र ॲप सेवा बंद केलेली नसून ती पुन्हा सेवेत येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वाहन चालकांच्या समस्येचे निराकरण –

प्रवाशांबरोबरच वाहन चालकांना येणाऱ्या अडचणींची नोंद या अ‍ॅप करता येणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी घेतानाच वाहन चालकांना परवाना, लायसन्स (अनुज्ञप्ती) व वाहन सेवेबाबात येणाऱ्या समस्या यावर नोंदविता येणार आहेत.

मोबाईल अ‍ॅप कसे काम करेल –

  • प्रवासी आणि वाहनचालकांना मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात येईल.
  • त्यात संबंधितां माहिती नोंदवावी लागेल.
  • अ‍ॅपमध्ये छायाचित्र काढण्याची व ते अपलोड करण्याची सुविधा असेल.
  • यामध्ये तक्रारींचे पर्याय असतील. ते निवडावे लागतील.
  • अॅपवर सर्व माहिती नोंदविल्यानंतर राज्यातील संबंधित आरटीओला ती कळेल व तक्रारीची दखल घेतली जाईल.
  • दखल घेऊन त्यावर केलेली कार्यवाही प्रवासी किवा वाहन चालकाला समजेल.