मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आर्थिक गर्तेत अडकली असून, एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, एसटीला प्रवासी तिकीटातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत आहे. परंतु, गेल्या दीड महिन्यापासून एसटीच्या महसुलात सातत्याने घट होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत दैनंदिन उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. गेल्या ४० वर्षांतील ही सर्वात मोठी घट आहे. एसटीचा आर्थिक तोटा दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार आणि एसटी महामंडळ झोपेचे सोंग घेऊन सुस्त बसले आहे, अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस केली.

एसटीची या वर्षाच्या सुरुवातीला झालेली भाडेवाढ लक्षात घेतली, तर उद्दिष्टाच्या तुलनेत प्रतिदिन साधारण ३२ कोटी ३६ लाख रुपये इतके अपेक्षित उत्पन्न मिळायला हवे होते. परंतु, ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत प्रत्यक्षात सरासरी २७ कोटी रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत एसटीच्या दैनंदिन उत्पन्नातील घट साधारण पाच कोटी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात एसटीच्या उत्पन्नाचा आलेख घसरला आहे. गेल्या ४० वर्षांतील ही सर्वात मोठी तूट आहे. यावरून एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसून येत आहे.

एसटीचा संचित तोटा दहा हजार कोटी रुपयांवर

दरवर्षी जून व जुलै महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर बाहेरगावी गेलेले प्रवासी परतीचा प्रवास करतात. या कालावधीत चांगले उत्पन्न मिळते. परंतु, या दोन्ही महिन्यात एसटी महामंडळाला उद्दिष्टांच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. अशीच परिस्थिती पुढील काही महिने राहिल्यास संचित तोटा वाढण्याची शक्यता आहे. सध्या संचित तोटा १० हजार कोटी रुपयांवर गेला असून एसटीसाठी ही धोक्याची घंटा आहे, अशी चिंता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारची तात्पुरती मलमपट्टी

तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात सातत्याने घट होत आहे, प्रवाशांची संख्या कमी होत असल्याने एसटी व्यवस्थापन अकार्यक्षम असल्याचे दिसून येते. दर महिन्याला राज्य सरकारकडून प्रतिपूर्ती रकमेतून वेतन देऊन तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. तसेच एसटी प्रवाशांना असुरक्षित, गैरसोयीची, अवेळी एसटीची सेवा मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक देणी, प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच एसटी महामंडळ आणि प्रवाशांची लालपरी वाचेल, असे बरगे यांनी सांगितले.