भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ठिकठिकाणी सभा गाजवीत असताना, नागपूर आणि पुण्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बंद खोलीच्या बाहेर आलेच नाहीत. त्यांनी लोकांशी संवाद साधला नाही वा वातावरण निर्मितीही केली नाही. परिणामी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नागपूर आणि पुणे या दोन्ही मतदारसंघांमध्ये किंवा परिसरात राजकीय लाभ उठविण्यात काँग्रेसला कितपत यश येणार, याबद्दल पक्षातच साशंकता व्यक्त होत आहे.  
मोदी यांचे दौरे किंवा सभा आयोजित करून भाजपकडून वातावरण निर्मिती केली जाते. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या माध्यमातूनही वातावरणनिर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण राहुल गांधी लोकांमध्ये मिसळलेच नाहीत. नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा सध्या काँग्रेसकडे आहेत. तसेच पुण्याची जागाही काँग्रेसकडे आहे. निदान मतदारसंघात भेटी किंवा लोकांशी संवाद साधला असता तरी त्याचा राजकीय लाभ झाला असता, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक !
विशेष प्रतिनिधी : दोन दिवसांच्या नागपूर आणि पुण्यातील आढावा सत्रात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बरोबर घेतले नसले तरी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार चांगले काम करीत असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले.  करणसिंग, ए. के. अ‍ॅन्टोनी यांच्याबरोबरीनेच आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर नेहमीच संवाद साधतो किंवा चर्चा करतो, असेही गांधी यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा इशारा
२७२ चा जादुई आकडा गाठण्याची कोणत्याही राजकीय पक्षाने अपेक्षा बाळगल्यास त्यात गैर काहीच नाही. पण त्याच वेळी राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येऊ शकत नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या वतीने राहुल गांधी यांना बुधवारी देण्यात आले. राष्ट्रवादीच्या विरोधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचताच राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्तेसाठी राष्ट्रवादीची गरज असल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीची आवश्यकता नाही, असा संदेश दिल्याने राष्ट्रवादीमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली. कोणत्याही एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. यामुळेच काँग्रेसला केंद्र आणि राज्यात राष्ट्रवादीशिवाय सत्ता मिळणे कठीण असल्याची जाणीव सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी करून दिली. प्रवक्ते नवाब मलिक यांनी विद्यमान राजकीय परिस्थिती ध्यानात घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाने मतप्रदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल गांधी यांचा राष्ट्रवादी किंवा शरद पवार विरोध जगजाहीर आहे. जागावाटपाचे सूत्र ठरलेले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जाहीर करीत असले तरी असे कोणतेच सूत्र ठरलेले नाही, असा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत. राहुल गांधी यांचाही राष्ट्रवादीला जास्त जागा सोडण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येते.

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल