राष्ट्रवादी काँग्रेसची साथ भाई जगताप यांच्या पथ्यावर; कदम यांचा विजय निश्चित
भाजपने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोराच्या बाजूने झुकले तरी मनसेचे तटस्थ राहणे, राष्ट्रवादीची साथ आणि शिवसेनेने दुसऱ्या पसंतीची मते कोणालाही न देणे या साऱ्या घडामोडी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पथ्यावरच पडल्या आहेत. सर्वच पक्षांमध्ये फाटाफूट झाल्याचे चित्र असल्याने विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुसऱ्या जागेची उत्कंठा कायम राहणार आहे.
मनसे तटस्थ राहिल्याने पहिल्या पसंतीची ६७ मते मिळविणारा विजयी होऊ शकतो. शिवसेनेला ८६ नगरसेवकांचे पाठबळ असल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विजयात अडचण येणार नाही. दुसऱ्या जागेकरिता काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्यात चुरस आहे. राष्ट्रवादीची मते लाड यांना मिळतील, अशी शक्यता होती; पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच लक्ष घातल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा डाव यशस्वी झाला नाही. तरीही राष्ट्रवादीची काही मते लाड यांना मिळाल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ५३ नगरसेवक असले तरी काही मते फोडल्याचा दावा लाड करीत होते. भाजप (३१), समाजवादी पार्टी (आठ) तसेच काही अपक्षांच्या मदतीने लाड यांना पल्ला गाठणे कठीण जाऊ शकते. काँग्रेस व राष्ट्रवादीची मते मोठय़ा प्रमाणावर फुटली असली तरच लाड निवडून येऊ शकतात. समाजवादी पक्षाची काही मते फुटून काँग्रेसकडे गेल्याचा दावा केला जात होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बेबनाव निर्माण करण्याकरिता भाजपने तिरकी चाल खेळली. लाड यांना मते देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याची शिवसेनेला कल्पना देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री रामदास कदम यांना विक्रमी मतांनी विजयी व्हाल, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी भाजपच्या या खेळीचा शिवसेनेला अंदाज आला. शिवसेनेने दुसऱ्या पसंतीची मते लाड यांना दिली असती तरी काँग्रेससाठी धोक्याचा इशारा होता. मनसे तटस्थ राहिल्याने काँग्रेसचे भाई जगताप बाजी मारतील, अशी चिन्हे आहेत. आमची काही मते फुटतील हे गृहीत धरून आम्हीही काही मते अन्य पक्षांची मिळविल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून केला जात होता.

भाजपने मते का दिली नाहीत याबद्दल आशीष शेलार यांनाच विचारा.
– शिवसेना उमेदवार रामदास कदम

शिवसेनेच्या प्रतिक्रियेवर ‘नो कॉमेन्टस’.
मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार

दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे भाई जगताप निवडून येतील.
– मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम

राष्ट्रवादीने काँग्रेसलाच मतदान केले.
-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक</strong>