विलेपार्ले येथील काँग्रेस नगरसेविकेच्या निवासस्थानाच्या आवारातील गॅरेजमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या शोरूमविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या अनधिकृत बांधकामामुळे नगरसेविकेचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक ६५ मधील काँग्रेसच्या नगरसेविका बिनिता व्होरा यांच्या विलेपार्ले येथील कुंज विहार या निवासस्थानाच्या आवारातील गॅरेजमध्ये तीन वर्षांपासून ‘वन शॉप’ नावाचे शोरूम उभारण्यात आले आहे. हे निवासस्थान त्यांचे पती मेहुल व्होरा यांच्या नावावर आहे. चार हजार चौरस फूट जागेत करण्यात आलेले हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयाने २००९ मध्येच दिले होते. मात्र पालिका अधिकारी आजतागायत त्याकडे काणाडोळा करीत आहेत. शिवसेनेचे विभागप्रमुख आणि आमदार अनिल परब आणि उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी या अनधिकृत बांधकामाविरुद्ध पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार केली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी बिनिता व्होरा यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी या दोघांनी केली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम तोडण्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी हे अनधिकृत बांधकाम तातडीने तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन या दोघांना दिले.
दरम्यान, हे बांधकाम जुने असून बिनिता व्होरा या गेल्या वर्षी निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2013 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामामुळे काँग्रेस नगरसेविका गोत्यात
विलेपार्ले येथील काँग्रेस नगरसेविकेच्या निवासस्थानाच्या आवारातील गॅरेजमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या शोरूमविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या अनधिकृत बांधकामामुळे नगरसेविकेचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
First published on: 16-03-2013 at 04:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress female corporeter in trouble over illegal construction work