रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांची टिप्पणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपद माझ्याकडे असताना तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांशी विविध विषयांवर माझेही मतभेद होत असत. मात्र, असे मतभेद असू शकतात, हे स्वीकारण्याची सहिष्णुता त्या नेतृत्वाकडे होती, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी केली.

रेड्डी यांच्या ‘अ‍ॅडव्हाइस अँड डिसेन्ट’ या आत्मचरित्राचे प्रकाशन लवकरच होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर दिलेल्या विशेष मुलाखतीत रेड्डी यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकार यांच्यात मतभेद होण्याचे प्रसंग अनेकदा येत असतात. त्याबाबत विचारणा केली असता, काम करीत असताना सगळ्यांचेच परस्परसंबंध छानछान राहतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असे रेड्डी म्हणाले.

केवळ अशा छानछान संबंधांनी कामे होत नसतात. कुठलेही काम करताना एकमेकांना प्रश्न विचारणारे, जाब विचारणारे लोक असणे आवश्यक असते. अशावेळी फक्त मतभेद आहेत या गोष्टीचा बाऊ करून चालत नाही. त्या सगळ्या प्रक्रियेतून हाती काय लागते ते महत्त्वाचे असते, अशी मांडणी रेड्डी यांनी केली.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी रेड्डी यांच्याकडे असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमध्ये आर्थिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी काम करीत होती. स्वत मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, माँटेकसिंग अहलुवालिया आदींचा त्यात समावेश होता. माझ्या गव्‍‌र्हनरपदाच्या कार्यकाळात सरकारमधील अशा मंडळींशी मतभेद होण्याचे प्रसंग निर्माण व्हायचेच. मात्र समोरच्या व्यक्तीचे आपल्या मतापेक्षा वेगळे असे काही मत असू शकते हे स्वीकारण्याची सहिष्णुता त्यांच्याकडे होती, अशी टिप्पणी रेड्डी यांनी केली. शिवाय, अशी सहिष्णुता असलेल्या लोकांमुळेच मी माझे मतभेद मांडू शकलो. याचे श्रेय त्याच सत्ताधाऱ्यांना जाते, अशी पुस्तीही जोडली.

मनमोहन सिंग हे पंतप्रधान असतानाचा काळ आर्थिकदृष्टय़ा मन्वंतराचा होता. जागतिकीकरणाने अर्थव्यवस्था कवेत घेण्यास सुरुवात केल्याचा तो काळ होता. धोरणांमध्ये अत्यंत मूलगामी असे बदल होत होते. अशा वेळी मतभेद उद्भवणे हे अगदी स्वाभाविकच होते, याचे स्मरण रेड्डी यांनी करून दिले. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी अनेकदा मतभेद झाले. आमच्यातील संबंध उत्तम वगैरे नव्हतेच. मात्र जे मतभेद होते ते पूर्णत तात्विक स्वरूपाचे होते. त्यात वैयक्तिक असे काही नव्हते, असेही रेड्डी यांनी या मुलाखतीत नमूद केले.

फक्त कृषिकर्जमाफीला बोल कशासाठी?

एकीकडे एअर इंडियासारख्या कंपनीवरील हजारो कोटी रुपये कर्जाची फेररचना तुम्ही करणार असाल, त्यांना सवलती देणार असाल तर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बोल कसे लावता येतील, असा प्रश्न त्यांनी केला. कृषिकर्जमाफीने वित्तीय शिस्त बिघडते हे खरेच, मात्र इतरांच्या कर्जाबाबतची तसेच आहे की, असा मुद्दा रेड्डी यांनी मांडला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress government rbi former governor y v reddy
First published on: 27-06-2017 at 04:46 IST