मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस शुक्रवारी राज्यभरात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात आंदोलन करेल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम असून १०० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकं, फळबागा बाधित झाल्या आहेत. लाखो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो जनावरांचा मृत्यू झाला, लाखो घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व वस्तूंची प्रचंड नासाडी झाली आहे. हजारो घरे कोसळल्याने लोक बेघर झाले आहेत. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपये मदत द्यावी व विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे. पण सत्तेच्या मस्तीत मदमस्त झालेले महाभ्रष्ट महायुती सरकार या संकटाकडे डोळेझाक करत आहे. शेतकऱ्यांना दिवाळीआधी कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी सपकाळ यांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या कारभाराचा निषेध

संविधानाने सर्व जाती-धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मूठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व राजसत्ता असावी हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या या धोरणाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या काळ्याकुट्ट कारभाराचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करतो. संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे संघाचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. १०० वर्ष पूर्ण करताना संघाने आता संविधान अंगिकारावे, महात्मा गांधींचा फोटो व संविधान संघ कार्यालयात ठेवावे तसेच रा. स्व. संघाची नोंदणी करावी, असेही ते म्हणाले.