लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अस्थिर झालेली आपली आसने शाबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी परस्परांशी सहकार्याचा हात पुढे केला आहे. त्यानुसार माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांच्या सहकारातील समृद्धीसाठी २०० कोटी रुपयांची खिरापत वाटण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून तसा प्रस्ताव सहकार विभागाने वित्त विभागाला पाठवला.
गेल्या काही वर्षांत विदर्भातील सहकार चळवळ ‘कोमा’त गेली असून १७ पैकी तब्बल ११ सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत. सहकारी सूतगिरण्यांची अवस्थाही वेगळी नाही. यातील बहुतांश सहकारी संस्था काँग्रेसवाल्यांच्या आहेत. विदर्भातील सहकार चळवळीकडे दुर्लक्ष झाल्याने येथे काँग्रेस कमकुवत होत असल्याचे लक्षात आल्याने यात बदल घडवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. विदर्भातील आजारी सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांना सरकारी पातळीवर मदत करून हे प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील बोदेगाव येथील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या ‘जय जवान सहकारी साखर कारखान्या’सह राष्ट्रवादीचे मंत्री मनोहर नाईक यांचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना आणि पुसद येथील वसंत सहकारी साखर कारखाना या तीन कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार २०० कोटी खर्च करणार असल्याचे समजते.
’या कारखान्यांनी थकवलेली सरकारची ४५ ते ५० कोटींची देणी माफ करण्यात येतील.
’‘जय जवान’वर ४७ कोटी, ‘नाईक’वर  ६० कोटी, तर वसंत सहकारी साखर कारखान्यावर ५१ कोटींचे राज्य बँकेचे कर्ज आहे. हे कर्जही ‘वनटाइम सेटलमेंट’ च्या माध्यमातून फेडण्यात येईल.
’हे कारखाने दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले जातील. त्याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाने वित्त विभागाकडे पाठविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leaders upliftment from cooperation sector
First published on: 07-07-2014 at 02:53 IST