वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा बॅनर लागल्याने कोळंबकर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कोळंबकर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेमधून झाली होती. सर्वसामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे.

२००४ साली नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कट्टर राणेसमर्थक अशी त्यांची ओळख होती. सुरुवातीला राणेंबरोबर ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यापैकी बहुतांश नेते पुन्हा शिवसेनेत परतले. पण कोळंबकर राणेंसोबत एकनिष्ठ राहिले.

मधल्याकाळात नारायण राणेंनी काँग्रेससोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यावेळी कोळंबकर त्यांच्यासोबत गेले नाहीत. पण त्यांच्या बॅनरवर राणेंचा फोटो असायचा. पण आता त्यांच्या जनसंर्पक कार्यालयाच्या बॅनरवरुन राणेंचाही फोटो गायब झाला असून तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लागला आहे. कालिदास कोळंबकर यांनी अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

मागच्या काही महिन्यात मतदारसंघात त्यांनी लावलेल्या अनेक बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. तेव्हापासून ते भाजपावासी होणार अशी चर्चा होती. शांत, संयमी स्वभावाच्या कालिदास कोळंबरकर यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यामुळे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी आपली जागा कायम राखली. शिवसेना-भाजपाच्या युतीमुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण वडाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचीही ताकत आहे. शिवसेनेने या जागेवरील दावा कायम ठेवल्यास कोळंबकरांच्या अडचणी वाढू शकतात.

Story img Loader