scorecardresearch

जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निषेध ; ‘खोटे’ गुन्हे मागे घेण्यासाठी राज्यपालांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवर  टीका केल्याने आमदार मेवानी यांना आसाम पोलिसांनी अटक केली.

मुंबई : गुजरातमधील काँग्रेस समर्थक अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने त्यांना झालेल्या अटकेचा महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. मेवानी यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवर  टीका केल्याने आमदार मेवानी यांना आसाम पोलिसांनी अटक केली. त्या प्रकरणात त्यांना जामीन मिळताच, एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली. मेवानी हे काँग्रेस समर्थक आमदार आहेत. त्यांच्या अटकेची दखल घेत अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशातील सर्व प्रदेश काँग्रेस समित्या व विधिमंडळ पक्षाने बैठका घेऊन या घटनेचा निषेध करावा, असे पत्र पाठविले. त्यानुसार महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी विधानभवनात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आदी मंत्री व पक्षाचे आमदार उपस्थित होते. लोकप्रतिनिधीने पंतप्रधानांकडून असलेल्या अपेक्षा करणारे ट्वीट करणे, हा अपराध नाही. लोकशाही व संविधानाने सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु भाजपच्या सरकारने मनमानीपणे सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून मेवानी यांना अटक केली. ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी आहे, असे राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress party condemned jignesh mewani s arrest zws

ताज्या बातम्या