काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला जबाबदार असलेला ‘वांद्रय़ाचा साहेब’ नेमका कोण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार हे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट करावे, असा टोला लगावत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी भ्रष्टाचाराचे आगार बनलेली मुंबई महापालिका तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई महापालिकेतील नालेसफाई, रस्ते, टॅब असे एकामागून एक घोटाळे उघडकीस येत आहेत. गेली १६ वर्षे पालिकेत शिवसेना-भाजप युती सत्ता उपभोगत आहे. मुंबईकरांना स्वच्छ, मुबलक पाणी, चांगले रस्ते मिळत नाहीत. अनेक सुविधांपासून मुंबईकर वंचित राहिले असून मुंबईकरांची ससेहोलपट होत आहे. मुंबई महापालिका आपल्या कामांमध्ये फोल ठरल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका तात्काळ बरखास्त करावी आणि पालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी संजय निरुपम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. भ्रष्टाचार बोकाळल्यामुळे १९८२ मध्ये मुंबई महापालिका बरखास्त करण्यात आली होती. त्याची आठवण निरुपम यांनी यावेळी करून दिली.पालिका बरखास्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले जाईल, असा इशारा निरुपम यांनी दिला.
भ्रष्टाचाराबाबत चौकशी करा
सुधारित विकास नियोजन आराखडा म्हणजे मोठा घोटाळा असून बिल्डरांसाठी ‘ना विकास क्षेत्र’ खुले करण्यात आले आहे. या घोटाळ्यात शिवसेना, भाजपबरोबर आयुक्तांचा हात आहे, असा आरोप निरुपम यांनी केला. पालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.



