मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार आपला नसेल ना या भीतीने पछाडलेल्या काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींचा उमेदवार विजयी झाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. राष्ट्रवादीच्या आमदारांची अभेद्य एकजूट बघायला मिळाली. प्रफुल्ल पटेल हे सुरक्षित क्षेत्रात (सेफ झोन) होते. काँग्रेसकडे ४४ मतदार होते, त्यामुळे त्यांचा उमेदवार काहीसा धोक्याच्या क्षेत्रात (डेंजर झोन) होता, अशी चर्चा होती.

अतिरिक्त मते असल्याने राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे सुरुवातीपासूनच सुरक्षित होते. काँग्रेसलाच भीती होती. उत्तर प्रदेश हे राजकीय कार्यक्षेत्र असलेले इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी दिली. प्रतापगढी हे पक्षश्रेष्ठींच्या अत्यंत निकटवर्तीय वर्तुळातील मानले जातात. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आणि चिंताही राज्यातील नेत्यांना लागली होती.  काँग्रेसच्या सर्व आमदरांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यांना मतदान कशा प्रकारे करायचे याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून  नेत्यांचा आमदाराभोवती पहारा होता. भाजपने काँग्रेसच्या उमेदवाराला दगाफटका देण्याचा इशारा दिल्याने काँग्रेस नेते सावध झाले होते.  काँग्रेस उमेदवाराच्या विजयात राज्यातील दोन प्रमुख व अनुभवी नेत्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. एक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. काँग्रेसचे संख्याबळ ४४ असले तरी दोन मते मित्र पक्षांकडे वळविण्यात आली होती. ऐनवेळी काहीही घडू शकते, याचा अंदाज असल्याने एमआयएमची दोन मते काँग्रेस उमेदवारालाच मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या तीन विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक ४४ मते इम्रान प्रतापगढी यांना मिळाल्याने काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना तेवढाच दिलासा मिळाला.

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला बरेच काही शिकवून गेला आहे. पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकोप्याने लढेल. यापुढील काळात अधिक सावधानतेने निवडणुकांना सामोरे जावू.

–  छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress strategy victory succeeds impossible unity ncp mlas ysh
First published on: 12-06-2022 at 00:02 IST