मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू करण्यात आलेल्या ‘भारत जोडो यात्रे’च्या महाराष्ट्रातील आगमनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. यात्रेच्या आगमनाआधी व प्रत्यक्ष आगमनाच्या वेळी कोणती तयारी करायची आणि यात्रा पुढे निघून गेल्यानंतर त्या त्या भागातील स्थिती पूवर्वत करण्यासाठी काय काय करावे लागणार आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे एक पथक केरळला रवाना झाले.

भाजपने देशात द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे. ७ सप्टेंबरला या यात्रेला कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला आहे. देशातील १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांतून १५० दिवस ही यात्रा चालणार आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात यात्रेचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा १६ दिवस मुक्काम राहणार आहे. जवळपास दहा शहरांमध्ये त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यादृष्टीने प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या देखरेखेखाली राहुल गांधी यांच्या राज्यातील दौऱ्याची बारकाईने व जय्यत तयारी केली जात आहे.

भारत जोडो यात्रा सध्या केरळमध्ये आहे. यात्रेचे आगमन होण्याआधी काय तयारी करावी लागते, प्रत्यक्ष यात्रेचे आगमन झाल्यानंतर ती पुढे जाईपर्यंत कोणती तयारी करायची आणि यात्रा पुढे निघून गेल्यानंतर त्या त्या भागातील स्वच्छता व इतर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काय काय करावे लागणार आहे, याची यात्रा येऊन गेलेल्या काही ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेण्यासाठी आमदार अमर राजुरकर, प्रदेश सरचिटणीस अभिजित सकपाळ, अभिजित देशमुख यांच्यासह दहा पदाधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी केरळमध्ये दाखल झाले आहे. दोन दिवस वेगवेगळय़ा ठिकाणांना भेटी देऊन हे पथक उद्या राज्यात परतणार असून नांदेडमध्ये सोमवारी आयोजित केलल्या बैठकीत ते सर्व माहिती देतील.

राज्यात १६ दिवसांचा दौरा

राज्यात नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे भारत जोडो यात्रेचे आगमन होणार आहे. कोणत्या मार्गाने यात्रेचे आगमन होणार आहे, पुढे कोणत्या मार्गाने व  कोण कोणत्या ठिकाणी जाणार आहे, त्या-त्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व नाना पटोले दौरा करणार आहेत. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पाश्र्वभूमीवर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील १६ दिवसांच्या दौऱ्याला राजकीयदृष्टय़ा महत्त्व प्राप्त झाले आहे.