काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमेरिकन पद्धतीनुसार निवडण्यासाठी राहुल गांधी यांनी राज्यातील औरंगाबाद आणि यवतमाळ या दोन मतदारसंघांची निवड केली असली तरी या दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत. यापूर्वी वरून उमेदवारी आणणारेच आता कार्यकर्त्यांमधून निवडले जातील एवढाच फरक असेल, असे बोलले जाऊ लागले आहे.
राहुल गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी १९ निकष ठरवून दिले आहेत. पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य पातळीवरील पक्षाचे प्रतिनिधी यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. उमेदवार निवडीसाठी त्यांनी निवडलेल्या देशातील १५ मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी जी पद्धत अवलंबिली आहे. त्याबाबत पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मिनतवारी करावी लागेल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
औरंगाबाद आणि यवतमाळ मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडीकरिता काहीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. नुसती मतदारसंघांची नावे झळकत आहेत, पण नक्की काहीच कळत नाही, असा दोन्ही जिल्ह्य़ांमधील कार्यकर्त्यांचा सूर आहे.
यवतमाळ-वाशिम हा मतदारसंघ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा जिल्हा. यवतमाळमध्ये माणिकराव ठरवतील तोच उमेदवार राहिल, असे कार्यकर्ते उघडपणे बोलतात. जिल्ह्य़ात ठाकरे यांच्या विरोधात एक गट सक्रिय असला तरी जिल्ह्य़ातील पक्षसंघटनेवर त्यांचाच वरचष्मा आहे.  आपल्या मुलाला उमेदवारी देण्याची माणिकरावांची योजना आहे. भाजपमधून निवडून आलेले, पण अणु कराराच्या वेळी काँग्रेसला मदत केलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड हे सुद्धा इच्छुक आहेत. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता.  यवतमाळमध्ये गटबाजीचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जिल्ह्य़ातील एका नेत्याने व्यक्त केले.
औरंगाबाद मतदारसंघ १९८९ पासून १९९८चा एकच अपवाद वगळता कायम शिवसेनेने सर केला आहे. यंदाही औरंगाबादमध्ये यश मिळण्याबाबत स्थानिक नेते साशंकच आहेत. औरंगाबाद काँग्रेसमध्ये तर कमालीची गटबाजी आहे. जालन्याचे माजी खासदार उत्तमसिंह पवार हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत. आमदार डॉ. कल्याण काळे लढण्यास इच्छूक नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress workers confused to understand rahul gandhi american methods of candidate selection
First published on: 18-02-2014 at 03:04 IST