मुंबई : वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची कासारवडवली-गायमूख मेट्रो ४ अ शी जोडणी पूर्ण करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे. कापूरबावडी जंक्शनजवळ ३२५ टन वजनाच्या स्टील स्पॅन बसविण्याचे काम नुकतेच एमएमआरडीएकडून यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या कामाच्या अनुषंगाने मेट्रो ४ मार्गिकेचे ८४.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे मेट्रो ४ आणि ४ अ ची जोडणी पूर्ण झाल्याने मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमूख या १०.५ किमीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला गती मिळणार असून हे काम निश्चित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. डिसेंबरअखेरीस हा १०.५ किमीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे.
मुंबईला ठाण्याशी मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो ४ प्रकल्प हाती घेतला आहे. तर मेट्रो ४ चा विस्तार कासारवडवली ते गायमूख असा मेट्रो ४ अ च्या मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या दोन्ही मार्गिकांची कामे सध्या वेगात सुरु आहेत. मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमूख असा १०.५ किमीचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण करत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यामुळे या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाला आणखी वेग दिला आहे. आता या कामातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा एमएमआरडीएने पूर्ण केला आहे.
कापूरबावडी जंक्शनजवळ मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेला जोडणारा भला मोठा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसविण्यात आला आहे. या कामामुळे मेट्रो ४ आणि ४ अ ची जोडणी पूर्ण झाली आहे. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ४८ मीटर लांबीचा आणि तब्बल ३२५ टन वजनाचा स्टील स्पॅन केवळ दोन रात्रीत बसविण्यात आला आहे. या स्टील स्पॅनची लांबी ४७ मीटर असून उंची १४ मीटर आहे. ४ पोलादी तुळयांवर हा स्टील स्पॅन बसविण्यात आला आहे.
मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेला जोडणारा ३२५ टन वजनाचा स्टील स्पॅन बसविण्यासाठी ७०० मेट्रीक टन आणि ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेन्सचा वापर करण्यात आला. तर ५०० टन आणि ८० टन क्षमतेच्या दोन क्रेन्स राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या स्टील स्पॅन बसविणअयासाठी १०० हून अधिक अभियंते, कामगार आणि सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात होते. ६ ट्रेलर्स, ३ हायड्राज, ४ आइसर ट्रक, ३ मॅनलिफ्टर्स, १ रुग्णवाहिकाही यावेळी तैनात होत्या. मेट्रो ४ आणि ४ अ ची जोडणी झाल्याने आता कॅडबरी जंक्शन ते गायमूख या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणआर आहे. तर यामुळे पहिल्या टप्प्यावरील मेट्रो गाड्यांच्या चाचणीचा मार्गही आता सुकर झाला आहे. येत्या काही दिवसातच चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.