मुंबई : चेंबूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने येथील झामा चौक – सुमन नगर दरम्यान रस्त्याचे काम हाती घेतले. मात्र गेल्या चार वर्षांत रस्त्याचे केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले असून दिवसेंदिवस या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटील बनू लागली आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ तोडगा काढून चेंबूरकरांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चेंबूरच्या माहुल गाव, गडकरी खाण आणि आणिक गाव परिसरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, टाटा वीज केंद्र आणि काही गॅस कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये – जा सुरू असते. याशिवाय चेंबूर कॉलनीमध्ये मोठी बाजारापेठ असल्याने दिवसभर तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. परिणामी, दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनांना अर्धा तास लागतो. या मार्गावर टाकण्यात आलेले मोनोचे काही खांब अडथळा ठरत असून महानगरपालिकेने आर. सी. मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.

हेही वाचा – पालिका रुग्णालयातील ‘ओपीडी’ आता आठ वाजता सुरु होणार! अन्यथा डॉक्टरांवर कारवाई….

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने चेंबूर कॉलनीतील झामा चौक – सुमन नगर हा राखीव रस्ता तयार करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. या मार्गात एक हजार झोपड्या बाधित होत होत्या. यापैकी केवळ कलेक्टर कॉलनी परिसरातील १५० झोपड्या जमीनदोस्त करून पालिकेने २०१९ मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. दोन वर्षांत सर्व झोपडीधारकांचे पुनवर्सन करून हा रस्ता तयार करण्यात येणार होता. मात्र चार वर्षे लोटली तरी केवळ ३० टक्केच काम करण्यात आले आहे.

हेही वाचा – धारावी ‘टीडीआर’च्या बदल्यात एफएसआयवरील निर्बंध हटवा! विकासकांची मागणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रस्त्यात बाधित होणाऱ्या अन्य झोपडीधारकांचे आद्यपही पुनर्वसन झालेले नाही. परिणामी, या झोपड्या रस्त्याला अडथळा ठरत असून दिवसेंदिवस रस्त्याच्या कामाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे महापालिका आणि म्हाडाने तत्काळ यावर तोडगा काढून चेंबूरमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.