अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते, पण यावर कुठे दाद मागायची याची माहिती त्यांच्याकडे नसते. मग आपल्यावर झालेल्या अन्यायाला नशिबाचे दूषण देऊन निमूटपणे गप्प राहण्यातच ग्राहक राजा समाधान मानतो. अशा ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासासाठी काम करणारी ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ आता आपल्याला थेट ऑनलाइन मार्गदर्शन करू शकणार आहे. या संस्थने नुकतेच स्काइपवर आपले खाते सुरू केले असून त्या माध्यमातून ग्राहकांना संस्थेपर्यंत पोहोचता येईल.
पत्र, फोन, ई-मेल यानंतर आता ग्राहक मार्गदर्शन संस्थाही लाइव्ह मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काळानुरूप संपर्काची माध्यमे बदलत चालली आहेत. अनेकदा लोकांना वेळ नसतो म्हणून ते कोणत्याही संस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. या सर्वामुळे ग्राहकांना संस्थेपर्यंत लवकरात लवकर पोहचता यावे व संस्थेतील मार्गदर्शकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी संस्थेने स्काइपवर आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी ग्राहकांना त्यांच्या स्काइप खात्यावर संस्थेच्या ूॠ२्र.’ीॠं’1/ूॠ२्र.’ीॠं’2 हे आयडी अ‍ॅड करावे लागतील. हे आयडी अ‍ॅड झाल्यानंतर ते ज्या वेळेस ऑनलाइन असतील तेव्हा थेट त्यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. यापूर्वी या तक्रारी ई-मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे स्वीकारल्या जायच्या. या सेवेमुळे ग्राहकांना संस्थेतील सेवांचा फायदा घरात बसल्या बसल्या घेता येणार आहे, असे संस्थेचे सचिव डॉ. एस. एस. कामथ यांनी स्पष्ट केले. स्काइपवरील लाइव्ह सत्र संस्थेतील विधिज्ञांकडून हाताळली जाणार आहेत. यामुळे लोकांना योग्य ते मार्गदर्शन मिळणार असल्याचेही ते म्हणाले. काळानुरूप संवाद माध्यमे बदलून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.