scorecardresearch

मुंबई : १२ वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलुंडमधील ग्राहकांना अखेर ‘महारेरा’कडून दिलासा

मुलुंडमधील निर्मल यूएस ओपन गृहप्रकल्पातील ग्राहकांना अखेर ‘महारेरा’ने मोठा दिलासा दिला आहे.

मुंबई : १२ वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलुंडमधील ग्राहकांना अखेर ‘महारेरा’कडून दिलासा
(लोकसत्ता ग्राफिक्स)

मुंबई : मागील १२ वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलुंडमधील निर्मल यूएस ओपन गृहप्रकल्पातील ग्राहकांना अखेर ‘महारेरा’ने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकल्पातील पाचपैकी दोन इमारतींची महारेरा नोंदणी संपुष्टात आली होती. तर नवीन विकासक कामच करीत नव्हता. पण, आता ‘महारेरा’ने या इमारतींच्या नोंदणीला मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता नवीन विकासकाला बांधकामाला सुरुवात करून प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करावा लागणार आहे.

निर्मल लाईफस्टाईल समुहाने २००९-१० मध्ये मुलुंड येथे ओपन यूएस नावाने गृहप्रकल्प आणला. या प्रकल्पात ५ इमारतींचा समावेश असून यात एकूण ८०० घरे आहेत. विकासकाने यातील दोन इमारतीचे १९ मजल्यांपर्यंतचे, तर दोन इमारतींचे वाहनतळाचे काम करून ग्राहकांना वाऱ्यावर सोडले. उर्वरित एका इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे, ‘महारेरा’ने २०१९ मध्ये नवीन विकासक रिकार्डो कन्स्ट्रक्शन्सची (शापूरजी – पालनजी समुहाची एक कंपनी) नियुक्ती केली. मात्र, या नवीन विकासकानेही कामाला सुरुवात केली नाही. दरम्यान, या प्रकल्पातील दोन इमारतींची ‘महारेरा’ नोंदणी वेगळी आहे, तर उर्वरित इमारतींची नोंदणी वेगळी आहे. १९ मजल्यापर्यंत बांधकाम झालेल्या दोन इमारतींच्या नोंदणीची मुदतही संपुष्टात आली. त्यामुळे, जोपर्यंत ‘महारेरा’कडून नोंदणीला मुदतवाढ मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू करता येत नाही. त्यामुळे, काम रखडले असून ग्राहकांची प्रतीक्षा वाढत आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

हेही वाचा – म्हाडा संक्रमण शिबिरातील घुसखोरीवर अंकुश; घरे वाटपाच्या नव्या धोरणांसाठी तज्ज्ञांची समिती

अखेर नवीन विकासकाने नोंदणीस मुदतवाढ घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मागील आठवड्यात ‘महारेरा’ने दोन इमारतींच्या नोंदणीला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली. मुदतवाढ मिळाल्याने आता नवीन विकासकाला बांधकाम सुरू करून ते २०२६ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, उर्वरित तीन इमारतींच्या नोंदणीची मुदत २०२५ पर्यंत आहे. पण, तरीही या इमारतींची कामे सुरू झालेली नाहीत. पण, आता या कामालाही सुरुवात होईल. बांधकाम सुरू करण्यासाठी संपूर्ण प्रकल्पासाठी बांधकाम सुरू करण्याची परवानगी (सीसी) विकासकाला घ्यावी लागणार आहे. आता एकूणच या संपूर्ण प्रकल्पाचे काम सुरू होण्याची आणि मार्च २०२६ पर्यंत घरे मिळण्याची ग्राहकांना आशा आहे.

हेही वाचा – ८८ हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत महाराष्ट्राची भरारी

‘महारेरा’च्या या निर्णयावर ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘महारेरा’ने आम्हाला मोठा दिलासा दिला असून, आता कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. विकासकाने पुढील सर्व प्रकिया पूर्ण करून कामास सुरुवात करावी आणि आम्हाला दिलासा द्यावा, असे या प्रकल्पातील ग्राहक रवी कुकीयन म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 09:32 IST

संबंधित बातम्या