पालिकेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालातील माहिती, रोगराईला आळा
मुंबई : शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत ४.६ टक्क्यांवरून अवघ्या एका टक्क्यावर आल्याचे पालिकेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालात (२०१८) नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश भागातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होत असून पाण्यावाटे होणाऱ्या रोगांवर आळा बसत आहे.
अंधेरी, विलेपार्ले या विभागात हे प्रमाण एक टक्क्यांहून कमी झाले असले तरी कुलाबा, भेंडीबाजार, वडाळा येथील दूषित पाण्याचे प्रमाण अधिक आहे. बोरिवलीमधील दूषित पाण्याचे प्रमाण पाच टक्क्यांवर कायम आहे तर २४ तास पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वांद्रे, खार व मुलुंडमध्ये बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांमुळे या भागातील दूषित पाण्याचे प्रमाण १० ते १३ टक्क्यांवरून १ ते २ टक्क्यांवर आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याचा शेकडो किलोमीटर जलवाहिन्यांच्या जाळ्यांमधून पुरवठा केला जातो. मात्र गटारांमधून, सांडपाण्याच्या वाहिनीशेजारून जाणाऱ्या जलवाहिन्यांमधील गळतीमुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी पालिकेकडून २४ विभागात व २७ सेवाजलाशयातून दररोज २०० ते २५० जल नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात. पावसाळा तसेच आपत्कालीन स्थितीत ३०० ते ३५० नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतात. पालिकेच्या जलचाचणी प्रयोगशाळेत पाणी दूषित करणाऱ्या कोलिफॉर्म, ई-कोलाय या जिवाणूंचा शोध घेतला जातो व त्यानुसार संबंधित दूषित पाण्याचा स्रोत बंद करण्याची कार्यवाही केली जाते. कुलाबा, भेंडीबाजार, वांद्रे पश्चिम, कुर्ला, मुलुंड या परिसरात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या तीन वर्षांत यातील बहुतांश भागातील पाणी दूषित होण्याचे प्रमाण लाक्षणिकरीत्या कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालातील माहितीनुसार २०१५-१६ या वर्षांत शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण सरासरी ४.६ टक्के होते. त्यातही ए वार्ड येथे ७ टक्के, बी वॉर्ड येथे ८ टक्के, एच पश्चिम येथे १० टक्के तर मुलुंड येथे १३ टक्के पाण्याचे नमुने दूषित आढळले होते. याशिवाय डी, एफ दक्षिण, एफ उत्तर, आर उत्तर, एम पूर्व, एम पश्चिम या विभागातही दूषित पाण्याचे प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक होते. मात्र दोन वर्षांत पालिकेने पाणीगळतीसाठी केलेले प्रयत्न, नव्याने टाकलेल्या जलवाहिन्या यामुळे दूषित पाण्याची टक्केवारी कमी झाल्याची माहिती पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्यांनी दिली. २०१७-१८ या वर्षांत दूषित पाण्याची टक्केवारी अवघ्या एका टक्क्यावर आली आहे. के पश्चिम (अंधेरी पश्चिम ते सांताक्रूझ पश्चिम) आणि पी उत्तर (मालाड) या विभागात दूषित पाण्याचे प्रमाण एक टक्क्यांहून कमी आहे. ए वॉर्डमधील दूषित पाण्याचे प्रमाण सात टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आले आहे तर बी वॉर्डमधील दूषित पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आले आहे. आर मध्य (बोरिवली) येथील दूषित पाण्याचे प्रमाण मात्र तीन वर्षांत कमी झालेले नाही.
पाणीपुरवठा सुधारला..
वांद्रे, खार आणि मुलुंड या परिसरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे पालिका अधिकारी आता मान्य करत असले तरी त्यासाठी गेल्या तीन वर्षांत बदलण्यात आलेल्या जलवाहिन्या व झडपांमुळे दूषित पाण्याची टक्केवारी मात्र घसरली आहे. एच पश्चिम (वांद्रे प. ते सांताक्रूझ प.) या विभागात २०१५-१६ मध्ये दूषित पाण्याचे प्रमाण १० टक्के होते ते २०१७-१८ मध्ये २ टक्क्यांवर आले आहे. तर मुलुंड येथील १३ टक्के प्रमाण १ टक्क्यांवर घसरले आहे.