अवघ्या अर्ध्या तासात करोना चाचणी! एक लाख चाचण्या करणार

७० वर्षावरील लोकांना परवानगीची गरज नाही, इ प्रिस्क्रिप्शन ला मान्यता, रॅपिड टेस्ट चाचणीचा खर्च ४५० रुपये

संदीप आचार्य 
मुंबई: गरोदर महिला, वयोवृद्ध तसेच करोना ची लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी यापुढे अवघ्या अर्ध्या तासात होणार असून यामुळे रुग्ण शोधण्यात व उपचारात गतिमानता येणार आहे. राज्य शासनाने रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिल्यानंतर मुंबई महापालिकेने ‘ मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ हाती घेतले असून या अंतर्गत मुंबईत एक लाख चाचण्या करण्यात येणार आहेत.

करोना रुग्णांच्या चाचण्याचे निकाल वेळेत मिळाल्यास कोमॉर्बिड रुग्णांना वाचविण्यात अधिक यश येऊ शकते. तसेच गरोदर माता व वयोवृद्ध लोकांनाही गतिमान उपचार देता येण्यासाठी रॅपिड टेस्टिंगला सोमवारी राज्य शासनाने मान्यता दिली. ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या ‘एस.डी.बायोसेन्सर’ या कंपनीकडून एक लाख किट खरेदी करण्यात येणार आहेत. सोमवारी या रॅपिड चाचणी संदर्भात मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर शासनाने रॅपिड टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला असून पालिका आयुक्त चहेल यांनी मंगळवारी पालिकेच्या सर्व संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन मुंबईतील करोना आटोक्यात आणण्यासाठी एक लाख चाचण्या करण्याचे जाहीर केले. यासाठी आम्ही ‘मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ राबवणार असल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

याअंतर्गत प्रत्येक वॉर्डातील करोना क्वारंटाईन सेंटरमधील करोना रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. कंटेनमेंट झोन तसेच हायरिस्क विभागात जाऊन पालिकेचे कर्मचारी तपासणी करून चाचण्या करतील. सध्या मुंबईत दररोज साडेचार हजार चाचण्या होत असून आम्ही दररोज दोन हजार जास्तीच्या चाचण्या करणार आहोत असे आयुक्त चहेल म्हणाले. मुंबईतील करोनाचा मुकाबला करायचा असेल तर जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे. सध्या मुंबईतील सर्व प्रयोगशाळांची क्षमता रोज दहा हजार चाचण्या करण्याची असून प्रत्यक्षात साडेचार हजार चाचण्या होतात. त्या वाढून रोज साडेसहा हजार चाचण्या होतील, असेही आयुक्तांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे ७० वर्षांवरील लोकांना चाचणीसाठी डॉक्टरच्या पत्राची गरज नाही. कोणतीही वृद्ध व्यक्तीची आता चाचणी परवानगीशिवाय होऊ शकेल. तसेच यापूर्वी रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे डॉक्टरांना बंधनकारक होते आता डॉक्टर रुग्णाला करोना चाचणी करण्यासाठी ‘इ प्रिस्क्रिप्शन’ देऊ शकतात, असा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईत किमान एक लाख चाचण्या करण्याचे आमचे उद्दिष्ट असून या रॅपिड चाचण्यांचे अहवाल अवघ्या पंधरा मिनिटे ते अर्ध्या तासात मिळणार असल्याने गंभीर तसेच कोमॉर्बिड रुग्णांना तातडीने उपचार करणे शक्य होणार असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी सांगितले. यामुळे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘एस. डी. बायोसेन्सर’ कंपनीबरोबर चर्चा करून एका चाचणीचा खर्च ४५० रुपये निश्चित करण्यात आला असून राज्य आपत्ती निवारण विभागातून या किट खरेदीसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय अबॉट व रॉश कंपन्यांच्या रॅपिड टेस्टिंग किटनाही मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या ७५ दिवसात प्रथमच मुंबईत करोना रुग्णांची संख्या ८४२ एवढी कमी झाली आहे. साधारणपणे मुंबईत दररोज १२०० ते १५०० रुग्ण आढळत असताना आता ८४२ एवढी करोना रुग्णांची कमी संख्या आढळणे ही महत्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ प्रति वॉर्ड ३५ केसेस असा होत असून करोना नियंत्रणासाठी आम्ही सर्व शक्ती पणाला लावू असे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona test in just half an hour bmcs universal testing scj