मुंबई : करोना विषाणूचे विविध प्रकार शोधणाऱ्या जनुकीय चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष मुंबई पालिकेने रविवारी जाहीर केले. तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण ३४३ रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत करोनाचा संसर्ग  नियंत्रणात असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

विषाणूचे विविध प्रकार शोधण्यासाठी जनुकीय चाचणी (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर दोन तुकडय़ांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या तिसऱ्या टप्प्यात करोना झालेल्या एकूण ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

नमुने घेतलेल्या ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१३ टक्के) रुग्ण हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९८ रूग्ण (२९ टक्के) ६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ११ रुग्ण (३ टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत. लसीकरण झालेल्यांना कमी धोका ..पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना करोनाबाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना करोना बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.