लशीच्या दोन्ही मात्रा घेऊनही बाधित; राज्यातील रुग्णसंख्या २३वर

मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस या करोनाच्या उपरिवर्तित विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही आरोग्य कर्मचारी असून यातील एकीने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. दरम्यान, राज्यातील डेल्टा प्लसची रुग्णसंख्या आता २३ झाली आहे.

मुंबईत जूनमध्ये जनुकीय क्रमनिर्धारण(जिनोम सि सिक्वेन्सिंग)  चाचण्यांसाठी दिलेल्या नमुन्यांचे अहवाल जुलैमध्ये पालिकेला प्राप्त झाले आहेत. यात दोन महिलांना डेल्टा प्लसची बाधा झाल्याचे आढळले आहे. यातील एक महिला २८ वर्षाची असून तिला २८ जूनला करोनाची बाधा झाली होती. हिने एकही लशीची मात्र घेतलेली नसून तिला ताप आणि डोकेदुखी ही लक्षणे होती. दुसरी महिला ५७ वर्षाची असून तिला २९ जूनला करोनाची बाधा झाली होती. या महिलेने लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या आणि तिला कोणतीही लक्षणे नव्हती.

दोन्ही रुग्णांना बाधा झाल्यावर रुग्णालयात दाखल केले होते. परंतु यापैकी एकाही रुग्णाला प्राणवायूची गरज भासली नाही. तसेच या दोन्हीची प्रकृती सध्या उत्तम आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे. या दोन्ही रुग्णांनी गेल्या काही काळात परदेशात प्रवास केलेला नाही असे ही माहितीमध्ये समोर आले आहे.

चार नमुने चाचणीसाठी

या बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतलेला असून यांचे सर्वेक्षणही केले आहे. यातील कोणाला लक्षणे होती का याची देखील माहिती घेतली आहे.

एका रुग्णाच्या संपर्कातील चार जण बाधित असल्याचे आढळले असून यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले आहेत. यांचे अहवाल अजून आलेले नाहीत, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

वेगाने संक्रमण

डेल्टा प्लस(अ.१) हे अधिक वेगाने संक्रमण होणाऱ्या डेल्टा(इ.१.६१७.२) या करोना विषाणूंचे उत्परिवर्तित रूप आहे. नवे उत्परिवर्तन हे करोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते.

राज्यात वाढती संख्या

राज्यात आत्तापर्यंत डेल्टा प्लेसचे २१ रुग्ण होते. रत्नागिरी, जळगाव, ठाणे, मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळले होते. यात मुंबईत डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळले होते. आता नव्याने आढळलेल्या दोन रुग्णामुळे मुंबईतील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या चार, तर राज्यातील संख्या २३ झाली आहे.

ऑगस्टपासून जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या

सिंगापूरच्या मालवाहतूक(कार्गो) विभागामध्ये अडकून पडलेले जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी यंत्र अखेर बुधवारी मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतील जनुकीय क्रमनिर्धारणा प्रयोगशाळा कार्यरत होणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून चाचण्या सुरू होतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.