दुसरी मात्रा घेण्यासाठी गर्दी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: राज्यात ऑक्टोबरपासून कमी  झालेल्या लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढला असून यात प्रामुख्याने दुसरी मात्रा घेण्यासाठी प्रतिसाद वाढला आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ३० लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

राज्यात ऑक्टोबरपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यावर लसीकरणाचा वेगही मंदावला. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दैनंदिन सरासरी सात ते आठ लाख नागरिकांना लस देण्यात येत होती. परंतु शेवटच्या आठवड्यापासून मात्र लसीकऱणाचा आलेख सरासरी चार ते पाच लाख नागरिकांपर्यंत कमी झाला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यात आणखी घट झाली आणि दिवाळीपूर्वी दैनंदिन सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना लस दिली गेली. दिवाळीच्या दिवसांत सणामुळे नागरिकच लसीकरणासाठी फारसे येत नसल्यामुळे या काळात फारसे लसीकरण होऊ शकले नाही. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा लसीकरणाने हळूहळू वेग घेतला आहे. तिसऱ्या आठवड्यात लसीकरणाचा आलेख पुन्हा सात लाखापर्यत येऊन पोहोचला आहे.

गेल्या दहा दिवसांत राज्यात सुमारे २४ लाख नागरिकांनी लशीची पहिली तर सुमारे ३० लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यात जवळपास ७५ लाख नागरिकांनी दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी लस घेतली नसल्याचे आढळले. त्यानंतर आरोग्य विभागाने या नागरिकांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पुन्हा वाढत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळीमुळे अनेकजण लसीकरणासाठी येत नव्हते. दिवाळीनंतर पुन्हा गर्दी वाढली आहे. तसेच ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात लसीकरण झाले होते. यातील अनेकांचे ८४ दिवस पूर्ण झाले असून आता दुसरी मात्रा घेण्यासाठी येत असल्यामुळेही लसीकरण वाढल्याचे मत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

केंद्राकडून हर घर दस्तक अभियान राबविले जात असून गेल्या काही दिवसांपासून घरोघरी जाऊन लसीकरणाचा आढावा घेतला जात आहे. दुसरी मात्रा न घेतलेल्यांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच लसीकरण वाढविण्यात प्रत्येक विभागामध्ये काय अडचणी आहेत याचा शोध घेऊन त्यानुसार उपाययोजना केल्या जात असल्यामुळे गेल्या काही दिवसांत प्रतिसाद वाढत असल्याचे  आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

 २३८ नवे रुग्ण

मुंबईत शुक्रवारी एका दिवसात २३८ नवीन रुग्णांची नोंद झाली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या तीनशेच्याही आत नोंदवली जात असून उपचाराधीन रुग्णाची संख्याही कमीकमी होऊ लागली आहे.  महिनाभरापूर्वी पाच हजाराच्यापुढे असलेली उपचाराधीन रुग्णसंख्या आता तीन हजाराच्या आत आहे. शुक्रवारी एकूण बाधितांची संख्या ७ लाख ६० हजारापुढे गेली आहे, तर एका दिवसात २७२ रुग्ण करोनामुक्त झाले. शुक्रवारी दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

दोन्हा मात्रा पूर्ण झालेल्यांचे प्रमाण ३८ टक्के

राज्यात सुमारे ७७ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ३८ टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. म्हणजेच राज्यातील १८ वर्षावरील सुमारे ९ कोटी १४ लाख जनतेपैकी सुमारे ३ कोटी ५० लाख जणांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient corona vaccination in mumbai state akp
First published on: 20-11-2021 at 01:15 IST