मुंबई : राज्यात करोनाचे नवे निर्बंध लागू झाल्याने सार्वत्रिक नाराजीचे वातावरण असताना मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने तर्क वितर्कांना उधाण आले.

शरद पवार हे मंगळवारी सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले व त्यांच्यात सुमारे तासभर बैठक झाल्याचे समजते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुरू असलेली चौकशी व त्याबाबत राज्य सरकारची पुढील भूमिका याबाबत चर्चा झाल्याचे तर्क  सुरू झाले.

तसेच टाटा कर्क रोग रुग्णालयाला आव्हाड यांनी शरद पवार यांच्या हस्ते सदनिका वाटप केल्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेली स्थगिती व त्यावरून दोन्ही पक्षांत झालेले नाराजी नाट्य पसरले होते.. तसेच सोमवारपासून राज्यात पुन्हा नवे निर्बंध लागू झाल्याने विविध व्यावसायिकांनी व्यक्त के लेली नाराजी, त्यामुळे राज्यभरात पसरलेली अस्वस्थता यावरूनही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्याचे समजते.

पवार-ठाकरे भेटीआधी सोमवारी संजय राऊत यांनी ठाकरे-पवार यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे दोन्ही पक्षांत काही निर्णयांवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळ व इतर सत्तास्थानांच्या वाटपावरून बैठक झाली होती. पण काही जागांचा प्रश्न सुटलेला नाही. यावरही चर्चा झाल्याचे समजते.

‘मुख्यमंत्र्यांसाठी ते अजूनही नरेंद्रभाईच’

महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस ही काही निर्णयांवरून शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंध अजूनही चांगलेच आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी ते अजूनही नरेंद्रभाईच आहेत, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. मात्र त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार स्थिर असून तो आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही  केला.