उपचाराधीन रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; अतिसंक्रमित भागांत आता सुधारणा 

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ९४ हजारांच्या पुढे गेली असली तरी, रुग्णवाढीचा आलेख घसरू लागला असल्याचे आशादायी चित्र आहे.

एकूण बाधितांपैकी ७० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर केवळ ३० टक्के म्हणजेच साधारण २३ हजार रुग्ण उपचाराधीन (सक्रिय) आहेत. मुंबईतील करोनाचा उद्रेक आता ओसरत असल्याचे चित्र आहे.

मुंबईतील एकेकाळचे अतिसंक्रमित भाग असलेले वरळी, भायखळा, धारावी या भागांत रुग्णवाढ आटोक्यात आली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतील सर्वच ठिकाणच्या झोपडपट्टी भागातील संसर्ग आटोक्यात आला असल्याचे २४ विभागांतील चित्र आहे. त्याचेच परिणाम म्हणून मुंबईतील रुग्णवाढ कमी होऊ लागली आहे.

टाळेबंदी शिथिल केल्यानंतर मुंबईतील रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र या काळातही मुंबईतील सध्याचा रुग्णवाढीचा दर घसरू लागला आहे. पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील करोनाचा भर आता ओसरू लागल्याचे चित्र आहे.

मुंबईतील २४ विभागांपैकी १७ विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर दीड टक्क्यांच्या खाली आहे, तर सात विभागांत तो १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. एकूण मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर १.३४ टक्के आहे. १ जुलै रोजी हाच दर १.६४ टक्के इतका होता.

मुंबईतील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण हे २२ जूनला ५० टक्के होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. १ जुलैला करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५७ टक्के होते, तर १४ जुलैपर्यंत हेच प्रमाण ७० टक्क्यांवर आले आहे. दर दिवशी आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने २२ जून रोजी ‘मिशन झिरो’ अर्थात शून्य रुग्ण कृती आराखडा जाहीर केला होता. विषाणूचा पाठलाग या धोरणांतर्गत संशयित रुग्णांचा शोध घेणे, घरोघरी जाऊन तपासण्या करणे, रुग्णांच्या निकट संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करणे अशा विविध उपाययोजनांमुळे रुग्णवाढ नियंत्रणात आली आहे.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २२ जून रोजी ३७ दिवस होता. तो आता ५२ दिवसांवर पोहोचला आहे. तर काही विभागांमध्ये हाच कालावधी १४० दिवसांवर पोहोचला आहे.

स्थिती काय?

मुंबईमध्ये मंगळवारी आणखी ९६९ रुग्णांची नोंद झाली; तर ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ९४ हजार ८६३ झाला आहे, तर एकूण मृतांची संख्या ५४०२ आहे. दिवसभरात १०११ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

वाढत्या चाचण्या 

मुंबईत ३ फेब्रुवारीला पहिली चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत मुंबईतील करोना चाचण्यांनी चार लाखांचा टप्पा पार केला असून आतापर्यंत ४,०१,७४१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. पालिकेने प्रतिजन चाचण्यांना सुरुवात केल्यामुळे दर दिवशीच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. दर दिवशी सरासरी चार हजार चाचण्या पूर्वी होत होत्या, ते प्रमाण आता साडेपाच हजार चाचण्यांवर गेले आहे. मात्र तरीही दर दिवशी नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे किंवा कमी होते आहे.