राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी करोनाने शिरकाव केला आहे. ‘सिल्व्हर ओक’ येथील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही करोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवार यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे”.

“दरम्यान शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आपण त्यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

“सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांच्या घरातील तसंच ज्या चाळीत राहतात तेथील लोकांची चाचणी केली जाणार आहे. त्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व गोष्टी केल्या जात आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus ncp sharad pawar silver oak bodyguard and others test positive sgy
First published on: 17-08-2020 at 10:46 IST