– संदीप आचार्य

राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा आहे. यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागतील हे लक्षात घेऊन दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली आहे.

येत्या १ एप्रिल पासून ही रक्तदान योजना सुरु होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत ०२२- २४२२४४३८ किंवा ०२२- २४२२३२०६ या नंबरवर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक न्यासशी संपर्क साधावा.

राज्यासह देशात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणाला रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. जागोजागी विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत आहे. मात्र, या करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्या ओस पडू लागल्या आहेत. आजघडीला राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायकाच्या माध्यमातून मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना तयार केली. यासाठी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’च्या डॉक्टरांशी संवाद साधला.

आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयातील रक्तपेढ्याचे डॉक्टर, गाड्या व तंत्रज्ञांच्या मदतीने एका दिवशी एक किंवा दोन सेसायटीत जाऊन रक्तदान शिबीर घेण्याचे आदेश बांदेकर यांनी निश्चित केले. ज्या सोसाट्यांना रक्तदानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सिद्धिविनायक मंदिराशी संपर्क साधून वेळ निश्चित करायचा आहे. १ एप्रिल पासून रोज किमान दोन शिबिरे घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिल्या टप्प्यात ही योजना केवळ मुंबईतील सोसायट्यांमध्ये राबविण्यात येईल असेही आदेश बांदेकर म्हणाले.

रक्ताची तीव्र टंचाई लक्षात घेता व करोनामुळे असलेल्या लॉकडाउनमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या मार्फत जास्तीजास्त रक्तदान शिबिरे घेण्याची सूचना केली आहे. आजघडीला राज्यात ३४१ रक्तपेढ्या आहेत तर मुंबईत ५८ रक्तपेढ्या आहेत. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये एकूण ३८,३०० रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत तर मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये केवळ ६,२२८ रक्ताच्या पिशव्या शिल्लक असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय जे जे महानगर रक्तपेढीत केवळ १००० रक्ताच्या पिशव्या असून जे जे महानगरची रक्त साठवण क्षमता ही ४५ हजार रक्ताच्या पिशव्या एवढी आहे. सामान्यपणे जे जे महानगरमधून दरमहा तीन ते साडेतीन हजार रक्ताच्या पिशव्या रुग्णांसाठी वितरित केल्या जातात. मात्र आता तेथे केवळ १००० रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदात्यांना रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचे तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले असले तरी लॉकडाऊन व पोलीस बंदोबस्त यामुळे रक्तदाते रक्तपेढ्यांमध्ये फिरण्यास तयार नसल्याचे रक्ततपेढीतील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अशावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाने सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे उचलेले पाऊल शस्त्रक्रियेसाठी गरज असलेल्या रुग्णांसाठी आशादायी म्हणावे लागेल.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात वर्षाकाठी सुमारे पाच लाख छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तर आरोग्य विभागाच्या राज्यातील ५०८ रुग्णालयात मिळून साडेचार लाख शस्त्रक्रिया होतात. याशिवाय वर्षाकाठी राज्यात २० लाख बाळंतपण होत असून यातील ८ लाख मुलांचा जन्म आरोग्य विभागाच्या रुग्णालयात तर चार लाख मुलांचा जन्म हा पालिका रुग्णालयात होत असतो. याशिवाय थॅलेसेमियाच्या ४,७०० मुलांना व सिकलसेलच्या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. तसेच डायलिसीसच्या रुग्णांनाही वेळोवेळी रक्ताची गरज लागते. राज्याची वार्षिक गरज ही १२ लाख रक्ताच्या पिशव्या म्हणजे महिन्याकाठी एक लाख २० हजार रक्ताच्या पिशव्यांची गरज असून आज राज्यात केवळ ३८ हजार रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत. त्यातच करोनामुळे मुंबई महापालिका तसेच शासकीय यंत्रणांनी सारी ताकद करोना़शी लढण्याला लावल्यामुळे केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची टंचाई दूर होणे अत्यावश्यक असल्यानेच रक्तदान शिबीरांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाने पुढाकार घेतल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.